स्टरलाइटच्या केबलची तपासणी आटोपली; रिलायन्सची पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 04:05 PM2019-12-31T16:05:23+5:302019-12-31T16:05:30+5:30

स्टरलाइट कंपनीच्या केबल तपासणीचे काम सोमवारी पूर्ण झाले असून, मंगळवारी कंपनी तसेच बांधकाम विभागाच्यावतीने आयुक्तांकडे अहवाल सादर केला जाणार आहे.

Sterlite's cable test ends; Reliance not intrested | स्टरलाइटच्या केबलची तपासणी आटोपली; रिलायन्सची पाठ!

स्टरलाइटच्या केबलची तपासणी आटोपली; रिलायन्सची पाठ!

Next

अकोला : महापालिकेच्या परवानगीशिवाय शहरात फोर-जी केबल टाकणाºया रिलायन्स जिओ इन्फोकॉम आणि नियमांचे उल्लंघन करणाºया स्टरलाइट टेक कंपनीच्या केबलची तपासणी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी दिले असता, मनपा प्रशासनाच्या निर्देशाकडे रिलायन्स कंपनीने पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे स्टरलाइट कंपनीच्या केबल तपासणीचे काम सोमवारी पूर्ण झाले असून, मंगळवारी कंपनी तसेच बांधकाम विभागाच्यावतीने आयुक्तांकडे अहवाल सादर केला जाणार आहे. मनपाच्या तपासणी प्रक्रियेकडे पाठ फिरवणाºया रिलायन्स कंपनीच्या प्रतिनिधींनी सोमवारी दुपारी बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांसोबत गुफ्तगू केल्यामुळे उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे.
मागील दोन वर्षाच्या कालावधीपासून शहराच्या विविध भागात फोर-जी केबलचे जाळे टाकल्या जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. संबंधित मोबाइल कंपन्यांनी शहरात खोदकाम करून केबलचे जाळे टाकण्यासाठी महापालिका प्रशासनाची परवानगी घेणे क्रमप्राप्त आहे. या ठिकाणी नेमका उलटा प्रकार होत असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले आहे. मनपाची २०१८-१९ मध्ये परवानगी न घेताच रिलायन्स कंपनीच्यावतीने काही भागात खोदकाम केल्या जात असल्याचे दिसून आले. यासंदर्भात मनपाच्या स्थायी समिती सभागृहात भाजपचे गटनेता राहुल देशमुख यांनी प्रशासनाला विचारणा केली असता, उपायुक्त वैभव आवारे यांनी रिलायन्स कंपनीला अशी कोणतीही परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतरही शहरात केबल टाकण्याचे काम सुरू असल्याचा ऊहापोह झाल्यानंतर प्रशासन कारवाई करीत नसल्याचे पाहून आमदार रणधीर सावरकर यांना समोर यावे लागले. त्यानंतर आयुक्त संजय कापडणीस यांनी रिलायन्स आणि स्टरलाइट कंपनीच्या केबलची खोदकाम करून तपासणीचे निर्देश दिले. आयुक्तांच्या निर्देशांकडे रिलायन्सने पाठ फिरवल्याचे समोर आले आहे.

कंपन्यांनी मनपाची फसवणूक केल्याचा साजिद खान यांचा आरोप
फोर जी केबल टाकण्यासाठी रिलायन्स व स्टरलाइट कंपनी परवानगी दिल्यानंतर त्यांनी खोदकाम करीत पाणीपुरवठ्याची पाइपलाइन फोडली आणि नियमानुसार काम न करता, मनपाची आर्थिक फसवणूक केली. त्यामुळे मनपा व नगरसेवकांची बदनामी होत आहे. हे काम सत्ताधारी पक्षाच्या काळात झाले आहे. त्यामुळे आयुक्तांनी याचा खुलासा करावा. अन्यथा विरोधी पक्षातर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनपाचे विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी सोमवारी दिला आहे.


रिलायन्सच्या अहवालाकडे लक्ष
मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी रिलायन्स आणि स्टरलाइट या दोन्ही कंपन्यांनी शहरात आजवर टाकलेल्या केबलची खोदकाम करून तपासणी करण्याचे निर्देश बांधकाम विभागाला दिले होते. खोदकाम करताना दोन्ही कंपनीच्या प्रतिनिधींना उपस्थित राहणे बंधनकारक होते. यादरम्यान केवळ स्टरलाइटचे प्रतिनिधी उपस्थित होते,तशी नोंद प्रशासनाने केली आहे. अर्थात रिलायन्सचे प्रतिनिधी हजर नसल्याने या कंपनीकडून मनपाला कोणता अहवाल दिला जातो, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.


सत्ताधारी भाजप संशयाच्या घेºयात
शहरात टाचणी जरी पडली तरी त्याची सविस्तर माहिती सत्ताधारी भाजपकडून ठेवल्या जाते. शहराप्रति अशा कर्तव्याची जाणीव ठेवणाºया सत्ताधारी भाजपाला जलवाहिनींची तोडफोड करणाºया मोबाइल कंपन्यांनी चालवलेला धुडगुस कसा दिसला नाही, यावर सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. या गंभीर प्रकरणी आमदार रणधीर सावरकर यांच्यावर मनपा प्रशासनाला निर्देश देण्याची वेळ आल्यामुळे सत्ताधारी संशयाच्या घेºयात सापडले आहेत.


मनपाकडून २२ ठिकाणी खोदकाम
मनपाच्या बांधकाम विभागाने मागील तीन दिवसांच्या कालावधीत स्टरलाइट कंपनीने टाकलेल्या केबलची २२ ठिकाणी खोदकाम करून तपासणी केल्याची माहिती आहे. यादरम्यान काही ठिकाणी आढळून आलेल्या इतर केबल प्रकरणी रिलायन्स कंपनीच्या प्रतिनिधींना विचारणा केली असता, त्यांनी सदर केबल त्यांच्या कंपनीचे नसल्याचे सांगितले. तशी नोंद मनपाने केल्याची माहिती आहे.

 

Web Title: Sterlite's cable test ends; Reliance not intrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.