Sting Operation : विभागीय आयुक्तांचा आदेश झुगारुन रुग्णालये लॉकडाउन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 11:00 AM2020-03-31T11:00:00+5:302020-03-31T11:04:29+5:30
हॉस्पिटलच्या बाहेरच बंदची सूचना लावून डॉक्टर बाहेरगावी असल्याचे फलकातूनच रुग्णांना डॉक्टरांनी बाहेरचा रस्ता दाखविला आहे.
- सचिन राऊत / प्रवीण ठाकरे
अकोला : कोरोना या संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी शासन व प्रशासन रात्रंदिवस लढा देत असतानाच खासगी डॉक्टरांनी मात्र त्यांचे हॉस्पिटल बंद केल्याचे धक्कादायक वास्तव लोकमतने सोमवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले आहे. हॉस्पिटलच्या बाहेरच बंदची सूचना लावून डॉक्टर बाहेरगावी असल्याचे फलकातूनच रुग्णांना डॉक्टरांनी बाहेरचा रस्ता दाखविला आहे.
राज्यातील डॉक्टरांसाठी महाराष्ट्र कोवीड उपाययोजना नियम २०२० साथरोग अधिनियम १८९७ लागू करण्यात आला आहे. त्यामुळे खासगी तसेच शासकीय सेवेत असलेल्या डॉक्टरांनी त्यांची सेवा देणे बंधनकारक आहे; मात्र असे असतानाही कायद्याला न जुमानता शहरातील बहुतांश हॉस्पिटल बंद करण्यात आले आहे. कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या भीतीने डॉक्टरांनीच मैदान सोडल्याचे वास्तव लोकमतने सोमवारी सकाळी ११ वाजतापासून दुपारी ४ पर्यंत केलेल्या पाहणीत उघड झाले आहे. अशा गंभीर प्रकारच्या संकटात रुग्णांना व प्रत्येकाला आधार देण्याची जबाबदारी ज्या डॉक्टरांवर आहे, त्यांनीच अशा प्रकारची भूमिका घेतल्याने रुग्णांमध्ये अधिक भीतीचे वातावरण आहे. शासकीय रुग्णालयामध्ये शासकीय सेवेतील डॉक्टर, परिचारिका व सफाई कामगार रात्रंदिवस सेवा देत आहेत; मात्र खासगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांनी या काळातच रुग्णसेवेतून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे आता अनेक औषधी व्यावसायिकही त्यांची दुकाने बंद ठेवण्याच्या मन:स्थितीत असून, ही सेवा कोलमडण्याच्या मार्गावर आहे.
असे आहेत विभागीय आयुक्तांचे निर्देश
कोरोना हा तीव्र स्वरूपाच्या संसर्गजन्य आजाराला आळा घालण्यासाठी प्रत्येक डॉक्टरने त्यांची ओपीडी तसेच इतर विभाग सुरू ठेवण्याचा आदेश आहे; मात्र या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित डॉक्टरांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व महाराष्ट्र कोवीड उपाययोजना नियम २०२० साथरोग अधिनियम १८९७ अन्वये कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे; मात्र बहुतांश डॉक्टर हा आदेश झुगारून हॉस्पिटल बंद करून बसले आहेत.
हा पळपुटेपणा तर नाही?
लोकमतने केलेल्या पाहणीत शहरातील बड्या हॉस्पिटलच्या संचालकांनी त्यांच्या हॉस्पिटलसमोर बाहेरगावी असल्याने तसेच विविध कारणे समोर करून हॉस्पिटल बंद केली आहेत. यावरून अशा महामारीचे संकट निवारण्याची जबाबदारी ज्या डॉक्टरांवर आहे, ते डॉक्टरच हॉस्पिटल बंद करून घरी बसल्याने त्यांचा हा पळपुटेपणा तर नाही, असा सवाल रुग्णांकडून उपस्थित केल्या जात आहे.
---------------------------