Sting operation : प्रवासासाठी विना तपासणीच दिले जाते वैद्यकीय पास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 10:40 AM2020-07-03T10:40:04+5:302020-07-03T10:43:01+5:30
सर्वोपचार रुग्णालयात विना प्राथमिक आरोग्य तपासणी वैद्यकीय पास दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार गत दोन दिवसांत ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आला.
अकोला : राज्यांतर्गत होणाऱ्या स्थलांतरणामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशात जिल्ह्यातून बाहेरगावी जाणाऱ्यांना सर्वोपचार रुग्णालयात विना प्राथमिक आरोग्य तपासणी वैद्यकीय पास दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार गत दोन दिवसांत ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आला.
जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. त्यावर अंकुश लावण्यासाठी प्रशासनामार्फत विविध स्तरावर उपाययोजनाही केल्या जात आहेत; मात्र तरीही कोरोना रुग्णसंख्या वाढीचे सत्र सुरूच आहे. अशातच ‘लोकमत’ चमूने गत दोन दिवसांपासून सर्वोपचार रुग्णालयात स्टिंग आॅपरेशन केले. दरम्यान, कोरोनाच्या फैलावाला सर्वसामान्य नागरिकांसोबतच प्रशासनाचीही बेफिकिरी कशी कारणीभूत आहे, याचा खुलासा झाला. जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी प्रशासनाच्या पासची आवश्यकता आहे. त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र महत्त्वाचे आहे. याकरिता वैद्यकीय महाविद्यालयात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे; परंतु येथे डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी न करता येणाºया प्रत्येक व्यक्तीला थेट वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संबंधित व्यक्तीला कोरोनाची लक्षणे आहेत की नाही, याचीदेखील पडताळणी होत नसल्याचे वास्तव आहे. असाच काहीसा प्रकार जिल्ह्याबाहेरून येणाºया व्यक्तींसोबतही होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्याबाहेरून येणाºया बहुतांश व्यक्तींच्या हातावर होम क्वारंटीनचे शिक्केदेखील नसल्याची माहिती आहे. ही बेफिकिरीदेखील जिल्ह्यातील वा इतर जिल्ह्यात रुग्णवाढीसाठी कारणीभूत ठरू शकते; परंतु त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
असे केले स्टिंग
सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना बाह्यरुग्ण विभागात प्रवासाच्या पाससाठी वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जाते. गत दोन दिवस लोकमत चमूने त्या ठिकाणी पाहणी केली. बुधवारी पुणे येथे जाण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी विचारणा केली. यावेळी येथील कर्मचाºयांनी आधार कार्डाची मागणी केली,आधार कार्ड दिल्यावर त्यावरील नावाची खात्री करून कोणतीही तपासणी न करता वैद्य्रकीय तपासणी नंतरच्या प्रवासाची पास दिली. यावेळी रांगेत असलेल्या काही नागरिकांकडून तर केवळ नाव आणि वय विचारून वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन मोकळे झाले. या ठिकाणी त्यांना वैद्यकीय तपासणीसंदर्भात विचारले असता, ही पास मिळाल्यावर वैद्यकीय तपासणीची गरज नसल्याचेही तेथील एका कर्मचाºयाने सांगितले.
गुरूवारी आणखी एक पास मिळविण्यासाठी लोकमतची चमू तिथे पोहचल्यावर अमरावतीसाठी पास हवी असल्याचे सांगीतल्यावर तेथील कर्मचाºयाने नाव विचारले, तसेच सोबत कोण जाणार आहे का याची विचारणा केली. यावर चमुतील सदस्याने पत्नी व मुलीचे नाव सांगीतल्यावर त्यांचीही नावे पासवर नमुद करून अवघ्या काही मिनिटात पास उपलब्ध करून दिली.
इन्टर्नच्या भरवशावर ओपीडी
सर्वोपचार रुग्णालयात कोविडसाठी स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी प्रवासाकरिता लागणाºया वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी प्राथमिक आरोग्य तपासणी केली जाते; परंतु ही जबाबदारी इन्टर्न डॉक्टरांच्या खांद्यावर सोपविण्यात आल्याचे चित्र दिसून येते.
काय आहे नियम?
सर्दी, खोकला, ताप आणि थकवा या लक्षणांची तपासणी आवश्यक आहेत. थर्मल मीटरद्वारे शरीराच्या तापमानाची तपासणी आवश्यक.