स्टिंग ऑपरेशन : डॉक्टर नाही, आता तुम्ही उद्या या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:32 PM2020-02-26T12:32:28+5:302020-02-26T12:32:50+5:30
‘लोकमत’ने गत आठवडाभरात बाह्यरुग्ण विभागासह एक्स-रे, सोनोग्राफी विभागाची पाहणी केली.
- प्रवीण खेते
अकोला : आपत्कालीन उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ‘आता डॉक्टर किंवा तंत्रज्ञ उपलब्ध नाहीत, तुम्ही उद्या या...’ अशी उत्तरे देत कर्मचाऱ्यांकडूनच रुग्णांची हकालपट्टी होत असल्याचा धक्कादायक प्रकार सर्वोपचार रुग्णालयात ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंगमधून समोर आला आहे.
ग्रामीण भागातूनच नाही, तर शेजारील जिल्ह्यातूनही अनेक रुग्ण उपचारासाठी येथील सर्वोपचार रुग्णालयात येतात; पण ऐन वेळेवर डॉक्टरच्या अनुपस्थितीत अन् इतर कर्मचाºयांकडून रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना दिली जाणारी अपमानजनक वागणुक ीचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आला. ‘लोकमत’ने गत आठवडाभरात बाह्यरुग्ण विभागासह एक्स-रे, सोनोग्राफी विभागाची पाहणी केली. दरम्यान, एक्स-रे, सोनोग्राफी आणि सिटी स्कॅन विभागातील डॉक्टर आणि तंत्रज्ञ एक तास आधीच बाहेर जात असल्याचे निदर्शनास आले. सकाळी ८ ते दुपारी २ वाजतापर्यंत सुरू राहणारा हा विभाग दुपारी १ वाजताच बंद होतो. यावेळी लोकमत प्रतिनिधीने रुग्णाचा नातेवाईक म्हणून येथील कर्मचाºयाला विचारले असता, तेथील कर्मचाºयाने ‘तुम्ही उद्या या..., डॉक्टर आता त्यांच्या दवाखान्यात गेले, असे सांगत सोनोग्राफी विभागातून बाहेर काढण्यास सुरुवात केली.
प्रॅक्टीस खासगीत ‘एनपीए’ शासकीय
डॉक्टरांनी पूर्णवेळ शासकीय रुग्णालयातच रुग्णसेवा द्यावी, यासाठी शासनाकडून डॉक्टरांना व्यवसाय प्रतिरोध भत्ता म्हणजेच एनपीए दिल्या जातो; परंतु त्यानंतरही येथील काही मोजके डॉक्टर अन् तंत्रज्ञ वगळता बहुतांश डॉक्टर आणि तंत्रज्ञांची खासगीत प्रॅक्टीस सुरू असल्याचाही प्रकार यावेळी निदर्शनास आला.
अधिकारी म्हणतात, ही सेवा २४ तास सुरू
या प्रकारासंदर्भात येथील अधिकाºयांशी चर्चा केली असता, एक्स-रे, सोनोग्राफी आणि सीटी स्कॅन विभाग अत्यावश्यक सेवा म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे नियमानुसार, ही सेवा २४ तास सुरू असणे आवश्यक आहे. आपत्कालीन स्थितीत रुग्णांना सेवा दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रशासनाला डॉक्टर सोडून जाण्याची भीती
आधीच डॉक्टरांची संख्या कमी असून, त्यांच्यावर कारवाई केल्यास ते देखील सर्वोपचार रुग्णालय सोडून गेल्यास रुग्णसेवा विस्कळीत होण्याची भीती रुग्णालय प्रशासनाला आहे. याच गोष्टीचा फायदा घेत सर्वोपचार रुग्णालयात अनेकांचा मनमानी कारभार सुरू असल्याचे वास्तव आहे.