नवीन किराणा बाजारातील गोदामात छापा; प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 01:52 PM2019-07-20T13:52:07+5:302019-07-20T13:52:36+5:30
अकोला : राज्य शासनाने प्लास्टिक तसेच थर्माकोल बंदीचा निर्णय घेतल्यानंतरही शहरात सर्वत्र खुलेआमपणे प्लास्टिक पिशव्या व त्यापासून तयार होणाऱ्या ...
अकोला: राज्य शासनाने प्लास्टिक तसेच थर्माकोल बंदीचा निर्णय घेतल्यानंतरही शहरात सर्वत्र खुलेआमपणे प्लास्टिक पिशव्या व त्यापासून तयार होणाऱ्या वस्तूंची विक्री व वापर सुरू आहे. शुक्रवारी रात्री अचानक महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या उपस्थितीत वाशिम बायपास परिसरातील नवीन किराणा बाजारातील गोदामात छापा टाकू न प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी दोन्ही गोदामांना कुलूप लावण्यात आले असून, त्या ठिकाणी मनपाच्या सुरक्षारक्षकांना तैनात करण्यात आले आहे.
शासनाने प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तूंवर बंदी आणल्यानंतरही प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभाग, जिल्हा प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचे दिसून येते. शहरात खुलेआम प्लास्टिकपासून तयार होणाºया विविध वस्तू व पिशव्यांचे उत्पादन व विक्री होत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर करणाºया व्यावसायिकांविरोधात कारवाईचा आदेश जारी केला. शुक्रवारी रात्री वाशिम बायपास परिसरातील नवीन किराणा बाजारात मगनलाल गोपाल अॅण्ड सन्स आणि जोगी ट्रेडर्सच्यावतीने दुकान व गोदामात प्लास्टिकपासून तयार पत्रावळी, द्रोण, ग्लास, चमचे आदी मोठ्या प्रमाणात साठा असल्याची माहिती आयुक्त संजय कापडणीस यांना मिळाली. यावेळी आयुक्त संजय कापडणीस यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाचे प्रशांत राजूरकर, बाजार व परवाना विभाग प्रमुख संजय खराटे, अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र घनबहादूर तसेच सुरक्षारक्षकांनी किराणा बाजारातील गोदाम व दुकानाला कुलूप लावण्याची कारवाई केली.
दुकान संचालकाने काढला होता पळ!
महापालिकेचे उपायुक्त प्रमोद कापडे यांच्या उपस्थितीत एप्रिल महिन्यात नवीन किराणा बाजारात धाड टाकण्यात आली होती. त्यावेळी मगनलाल गोपाल अॅण्ड सन्स यांच्या गोदामात प्लास्टिक पत्रावळींचा मोठा साठा आढळून आला होता. त्यावेळी संबंधित संचालकाने पळ काढल्यामुळे मनपाने दुकानाला सील लावण्याची कारवाई केली होती. शुक्रवारी खुद्द आयुक्तांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आल्याने प्लास्टिक पिशव्यांची निर्मिती व विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
शासनाने निर्बंध आणलेल्या प्लास्टिक पिशव्या व त्यापासून तयार वस्तूंची विक्री करता येत नाही. बाजारात ठिकठिकाणी प्लास्टिक पिशव्यांची सर्रास विक्री होत असून, संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. झोन अधिकारी, आरोग्य निरीक्षकांनी कुचराई केल्यास त्यांच्यावरही कारवाई प्रस्तावित केली जाईल.
-संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.