एक क्विंटल प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 12:50 PM2018-08-04T12:50:49+5:302018-08-04T12:53:26+5:30
गोरक्षण रोडवरील साधना कलेक्शनवर मनपाने धाड घालून तब्बल एक क्विंटल प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्याची कारवाई केली.
अकोला : शासनाने प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिकपासून तयार होणाऱ्या ठरावीक वस्तूंच्या वापरावर बंदी घातल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाºया व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईचे हत्यार उपसले आहे. शुक्रवारी गोरक्षण रोडवरील साधना कलेक्शनवर मनपाने धाड घालून तब्बल एक क्विंटल प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्याची कारवाई केली. या प्रकरणी पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला.
प्लास्टिक पिशव्या व विघटन न होणाºया इतर वस्तूंमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. पर्यावरणाची हानी थांबवण्यासाठी शासनाने प्लास्टिक पिशव्या, थर्माकॉलसह इतर वस्तूंवर बंदी घातली. दंडात्मक रकमेचे धोरण स्पष्ट करताच महापालिकेच्या स्तरावर प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणारे, त्यांची विक्री करणाºया व्यावसायिकांवर कारवाई केली जात आहे. शुक्रवारी मनपा उपायुक्त अनिल बिडवे, क्षेत्रीय अधिकारी पुनम कळंबे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य निरीक्षकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाºया गोरक्षण रोडवरील साधना कलेक्शन येथून एक क्विंटल प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्याची कारवाई केली आहे. या कारवाईत आरोग्य निरीक्षक प्रताप राऊत, रूपेश मिश्रा, दीपाली घाडगे, वैभव चव्हाण, योगेश इंगळे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.