जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी-दरवाढ केल्यास कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 06:18 PM2020-04-05T18:18:16+5:302020-04-05T18:18:31+5:30
संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला.
अकोला : जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा पुरवठा असून, गरजेनुसार जिल्ह्यातील नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांना माल वाहतूक व उपलब्धतेसंदर्भात येणाºया अडचणी सोडविण्याठी जिल्हा प्रशासन मदत करणार आहे. तथापि, जीवनावश्यक वस्तूंची कोणत्याही प्रकारची साठेबाजी व दरवाढ केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी दिला. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’ कालावधीत जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता, मागणी व पुरवठ्यासंदर्भात करावयाच्या उपाययोजनांचा जिल्हाधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित बैठकीत आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) बाबासाहेब गाढवे, जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यू. काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांच्यासह किराणा विक्रेता संघटना, धान्य व्यापारी असोसिएशन, दालमिल असोसिएशन, केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशन, पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनचे पदाधिकारी, गॅस एजन्सीचे चालक उपस्थित होते. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करता येत नाही किंवा उपलब्धता नाही म्हणून टंचाई निर्माण होत असेल आणि त्याचा फायदा घेऊन वस्तूंची दरवाढ व साठेबाजी करण्यात येत असेल तर प्रशासन असे प्रकार खपवून घेणार नाही, असा इशाराही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिला.
वस्तू उपलब्धतेचा घेतला आढावा!
जिल्ह्यात गहू, तांदूळ, साखर, तेल, मीठ, मसाले, डाळी इत्यादी अन्नधान्यासह भाजीपाला, कांदे, बटाटे, बिस्कीट आदी जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी घेतला.
औषधी उपलब्धतेची घेतली माहिती!
जिल्ह्यातील औषधांच्या दुकानांमध्ये आवश्यक औषधांच्या उपलब्धतेची माहिती जिल्हाधिकाºयांनी घेतली. तसेच मास्क, सॅनिटायझर उपलब्धतेचा आढावादेखील जिल्हाधिकाºयांनी घेतला.