बार्शीटाकळी येथून गांजाचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:13 AM2021-06-22T04:13:41+5:302021-06-22T04:13:41+5:30
अकोला : बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक इसम राहत्या घरातून गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री करीत असल्याच्या माहितीवरून पोलीस ...
अकोला : बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक इसम राहत्या घरातून गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री करीत असल्याच्या माहितीवरून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने सोमवारी छापा टाकून सुमारे दोन किलो गांजाचा साठा जप्त केला. या ठिकाणावरून आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बार्शीटाकळी येथील रहिवासी सय्यद फैजान सय्यद निसार हा त्याच्या राहत्या घरातून प्रतिबंधित असलेल्या अमली पदार्थ गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पाळत ठेवून पथकासह सोमवारी दुपारी छापा टाकला. या इसमाच्या घरातून सुमारे दोन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.