चोरी गेलेले सोन्याचे दागिने, मोबाइल, दुचाकी मिळाली परत; पोलिसांच्या प्रयत्नांना यश
By नितिन गव्हाळे | Published: August 2, 2023 07:45 PM2023-08-02T19:45:06+5:302023-08-02T19:45:22+5:30
पोलिसांनी गेल्या महिनाभरात तब्बल १८ लाख ९१ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल शोधून १ ऑगस्ट रोजी मूळ मालकांना परत केला.
अकोला: शहरात अनेक चोरी, घरफोडीच्या घटना घडतात. चोरटे सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम लंपास करतात. दुचाकी चोरून नेतात; परंतु चोरीला गेलेले दागिने, रोख, दुचाकी परत मिळेल. याची खात्री नाही; परंतु पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या संकल्पनेतून चोरट्यांना जेरबंद करून हस्तगत केलेले दागिने, रोख, मोबाइल, दुचाकी तक्रारकर्त्यांना परत करण्यात येत आहेत. मंगळवारी पोलिसांनी तब्बल १८ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल परत केल्याने, तक्रारकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पोलिसांनी गेल्या महिनाभरात तब्बल १८ लाख ९१ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल शोधून १ ऑगस्ट रोजी मूळ मालकांना परत केला.
जिल्हाभरातील पोलिस स्टेशनच्या हद्दीतील चोरी गेलेला मुद्देमाल शोधून तो फिर्यादीस परत करण्याची मोहीम अकोला पोलिसांतर्फे राबविण्यात येत आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या हस्ते मंगळवारी ८ लाख ३५ हजार रुपये किमतीची एकूण १४ वाहने मालकांना परत करण्यात आली. याशिवाय तीन लाख ४२ हजार ९९४ रुपयांचे २३ मोबाइल, पाच लाख २१ हजार ८८१ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम व इतर एक लाख ९२ हजारांचा मुद्देमाल, असा एकूण १८ लाख ९१ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी मूळ मालकाला परत केली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, गोपाल मुकुंदे, गणेश धुंपटववाड, कुंदन खराबे उपस्थित होते.
निमकर्दा येथे सापडली एक लाखाची रोकड
निमकर्दा येथील पोलिस पाटील रामदास शेंडे यांना निमकर्दा येथील बसथांब्यावर एक लाख सहा हजार रुपये रोख असलेली बॅग सापडली होती. त्यांनी ती बॅग पोलिस स्टेशन उरळ येथे जमा केली. पोलिसांनी ती बॅग कोणाची आहे याबाबत शहानिशा करून शेगाव येथील राहुल शिरसाट यांचा शोध घेतला. त्यांची ही रोख रक्कम असल्याची खात्री करून उरळ पोलिस स्टेशनला बोलावून त्यांना ती परत करण्यात आली. पोलिस पाटील शेंडे यांच्या प्रामाणिकतेचे कौतुक करून पोलिस अधीक्षकांनी त्यांचे पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित केले.