चोरीस गेलेला ४२ लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना केला परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:18 AM2021-08-01T04:18:44+5:302021-08-01T04:18:44+5:30
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीस गेलेला मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस स्टेशनच्या पथकांनी चोरट्यांना ताब्यात घेऊन जप्त ...
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीस गेलेला मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस स्टेशनच्या पथकांनी चोरट्यांना ताब्यात घेऊन जप्त केला आहे. त्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया झाल्यानंतर हा मुद्देमाल परत करण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी विशेष कार्यक्रम आयोजित करून हा मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत केला. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या स्तरावर कार्यक्रम आयोजित करून हा मुद्देमाल परत करण्यात आला आहे. यामध्ये ७ लाख ५२ हजार २४० रुपये किमतीची चोरीस गेलेली १५ वाहने त्यांच्या मालकांना परत करण्यात आली आहेत. यासोबतच ४ लाख ५१ हजार ४९८ रुपयांचे ४३ मोबाइल परत करण्यात आले आहेत. १३ लाख ६० हजार ८९३ रुपयांचे सोने व चांदीचे दागिने फिर्यादींना परत करण्यात आले आहेत. यासोबतच १६ लाख ९१ हजार २०० रुपयांचा इतर मुद्देमाल असा एकूण ४२ लाख ५५ हजार ५९१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तो परत करण्यात आला आहे.
----------------------
एका वर्षात तीन कोटींचा मुद्देमाल परत
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अकोला पोलीस दलाची कमान सांभाळल्यानंतर विविध उपक्रम राबविले. याच दरम्यान ज्या फिर्यादीचा मुद्देमाल चाेरी गेला ताे तपास करून शाेधून त्यांना परत करण्यासाठी दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला परत करण्यासाठी विशेष उपक्रम राबविला़ या मोहिमेअंतर्गत जुलै २०२० ते जुलै २०२१ या एका वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांना सुमारे तीन कोटी ४९ लाख २६ हजार ४४८ रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींचा हा मुद्देमाल चोरीस गेल्यानंतर परत मिळाला त्यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व अकोला पोलिसांचे आभार मानले आहेत.
वाहने १५ किंमत ७ लाख ५२ हजार
माेबाइल ४३ किंमत ४ लाख ५१ हजार
दागीने किंमत १३ लाख ६० हजार
इतर मुद्देमाल १६ लाख ९१ हजार