पोलिसांवर दगडफेक!

By admin | Published: July 18, 2016 02:22 AM2016-07-18T02:22:11+5:302016-07-18T02:22:11+5:30

दारुड्याच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चांदखॉ प्लॉटमध्ये प्रचंड दगडफेक; दोन पोलीस किरकोळ जखमी.

Stoning of police! | पोलिसांवर दगडफेक!

पोलिसांवर दगडफेक!

Next

अकोला: जुने शहरातील हरिहरपेठेतील चांदखॉ प्लॉटमध्ये रहिवासी असलेल्या एका दारुड्याच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चांदखॉ प्लॉटमध्ये रविवारी सायंकाळी प्रचंड दगडफेक झाली. यामध्ये दोन पोलीस किरकोळ जखमी झाले असून समाजकंटकांनी पोलिसांवर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्नही केला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली.  या परिसरात संध्याकाळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
चांदखॉ प्लॉट परिसरातील रहिवासी सुरेश नवलकार हा यथेच्छ मद्यप्राशन करून चांदखॉ प्लॉटमधील इच्छा चहाच्या टपरीवर आला. त्यानंतर काही जणांशी वाद घालून त्याने त्या ठिकाणी आक्षेपार्ह वक्तव्य करीत परिसरातील नागरिकांनाही अश्लील शिवीगाळ केली. तो दारू प्यायला असल्याने नागरिकांनी त्यास समजाविण्याचा प्रयत्न केला. तसेच तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनीही त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र दारूच्या नशेत तर्र असलेल्या सुरेश नवलकारने अख्तर नावाच्या पोलीस कर्मचार्‍यास धक्काबुक्की केली. त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. दारुड्याचे आक्षेपार्ह वक्तव्य वाढतच गेल्याने वातावरण जास्त चिघळले. या दारुड्याच्या अशा बेताल वक्तव्यांमुळे संतप्त झालेल्या काहींनी प्रचंड दगडफेक केल्याने दोन पोलीस किरकोळ जखमी झाले. या दगडफेकीनंतर शहरासह जिल्हय़ात जातीय दंगल भडकल्याची अफवा पसरली. या दगडफेकीत ठाकूर नावाच्या कर्मचार्‍याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण आणि जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रियाज शेख हे घटनास्थळावर दाखल झाले. परिस्थितीची पाहणी केल्यानंतर दंगलसदृश परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस अधिकार्‍यांनी पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस दलास पाचारण केले. पोलिसांनी रस्त्यांवरील दुकाने बंद केली. या प्रकरणी सदर दारुड्यास जुने शहर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंंत सुरू होती.

जातीय दंगलीची अफवा
हरिहरपेठेतील चांदखॉ प्लॉटमध्ये दगडफेक झाल्यानंतर जातीय दंगल भडकल्याची अफवा पसरली होती; मात्र पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

बाजारपेठ बंद
दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी या परिसरातील दुकाने तातडीने बंद केली. कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यानंतर लगेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. दारुड्यास अटक करण्यात आली असून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: Stoning of police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.