टोइंग पथकांची अवैध कारवाई थांबवा
By admin | Published: June 7, 2017 01:51 PM2017-06-07T13:51:49+5:302017-06-07T13:51:49+5:30
शहरात कुठेही महापालिकेने नो-पार्किंग झोन निश्चित केले नाहीत.
अकोला: शहरात कुठेही नो-पार्किंग झोन नाहीत, रस्त्यावर हद्दीच्या खुणा नाहीत, तरीही महापालिका आणि वाहतूक शाखेकडून वाहने उचलण्याची कारवाई केली जाते, हा अवैध प्रकार तातडीने बंद न केल्यास महिला आघाडीकडून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना महिला आघाडी प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य ज्योत्स्ना चोरे यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदनातून दिला आहे.
वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्यामुळे रस्त्यावरील वाहने उचलण्याची कारवाई केली जाते; मात्र त्यापूर्वी वाहन रस्त्याच्या हद्दीत की बाहेर आहे, हे ठरवले जात नाही. तसेच शहरात कुठेही महापालिकेने नो-पार्किंग झोन निश्चित केले नाहीत. रस्त्यावर पट्टे आखले नाहीत. त्यामुळे रुग्णालये, शिकवणी वर्ग, मंगल कार्यालय परिसरातील वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्याचवेळी पथकाकडून वाहने उचलण्याची कारवाई केली जाते. त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात वाहनांचे नुकसानही केले जाते. या समस्या आधी निकाली काढाव्या, त्यानंतरच वाहने उचलण्याची कारवाई करण्याचे आदेश महापालिका, पोलीस विभागाला द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा चोरे यांनी दिला आहे.