कर्जमाफीबाबत शेतकर्यांची दिशाभूल बंद करा - शेकाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 02:01 AM2017-12-06T02:01:58+5:302017-12-06T02:02:27+5:30
शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभही शेतकर्यांचा पदरात पडला नाही. त्यामुळे शेतकर्यांची कर्जमाफीवरून दिशाभूल करणे बंद करा, या आणि इतर मागण्यांचे निवेदन भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने जिल्हाधिकार्यांना मंगळवारी देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हय़ासह संपूर्ण राज्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाने पिचले आहेत. चारही बाजूंनी आलेल्या संकटांमुळे शेतकर्यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत शासनाकडूनही कोणतीही मदत मिळत नसल्याने शेतकरी नागवला गेला आहे. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभही शेतकर्यांचा पदरात पडला नाही. त्यामुळे शेतकर्यांची कर्जमाफीवरून दिशाभूल करणे बंद करा, या आणि इतर मागण्यांचे निवेदन भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने जिल्हाधिकार्यांना मंगळवारी देण्यात आले.
शेतकर्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याबाबत सरकार गंभीर नाही. सरकारचे धोरण प्रत्यक्षात शेतकरीविरोधी आणि व्यापारी व दलाल धाजिर्णे आहे. न्याय्य मागण्यांसाठी शेतकर्यांना रस्त्यावर उतरावे लागत आहे, ही सरकारसाठी लाजिरवाणी बाब आहे. सरकारने शेतकर्यांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनात अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा, कर्जमाफीवरून शेतकर्यांची केली जात असलेली दिशाभूल बंद करावी व त्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, शेती पंप देयकांची थकबाकी वसुली बंद करावी, शेतकर्यांचा माल किमान आधारभूत किमतीने खरेदी करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रे त्वरित सुरू करावीत, कमी भावाने विकल्या गेलेल्या शेतमालाच्या फरकाची रक्कम शेतकर्यांना प्रदान करावी, बोंडअळीने नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकर्यांना दरहेक्टरी ५0 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदनावर शेकापचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई प्रदीप देशमुख, अकोला जिल्हा चिटणीस दिनेश काठोके, मध्यवर्ती समिती सदस्य सुनील मोडक, तालुका चिटणीस विजय मोडक, तालुका चिटणीस संजय चिंचोळकर, अँड. संतोष भोरे, जिल्हा संघटक दादासाहेब वाकोडे, मु. मुजामिल पांडे, संतोष देशमुख, प्रशांत लासुरकर, राजेंद्र काळणे आदींच्या स्वाक्षरी आहेत.