हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून गरिबांची लूट थांबवा! - बच्चू कडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 12:13 PM2020-02-21T12:13:49+5:302020-02-21T12:13:56+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत बच्चू कडू बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात हुंडी चिठ्ठीच्या आधारे होणाऱ्या व्यवहारातून आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अवाजवी कर्ज वसुलीतून गरिबांची होणारी लूट तातडीने थांबवून, यासंदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी गुरुवारी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) आणि जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांना (एलडीएम) दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक तारेणिया यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात हुंडी चिठ्ठीच्या आधारे होणाºया अवैध सावकारीच्या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीच्या कार्याचा आढावा जिल्हा उपनिबंधकांकडून पालकमंत्र्यांनी घेतला. हुंडी चिठ्ठीच्या आधारे अवैध सावकारीच्या व्यवहारासंदर्भात प्राप्त तक्रारीनुसार, या अवैध सावकारीच्या व्यवहारात कोण-कोण सहभागी आहे, यासंदर्भात शोध घेऊन, या व्यवहारातून गरिबांची होणारी लूट थांबली पाहिजे. त्यासाठी केलेल्या कारवाईचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा उपनिबंधक प्रवीण लोखंडे यांना दिले. तसेच महेंद्र फायनान्ससह जिल्ह्यातील सर्व मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणारे कर्ज वाटप, कर्ज वसुलीत आकारण्यात येणारा अवाजवी व्याज दर आणि त्यामधून होणारी गरिबांची लूट थांबविण्यासाठी केलेल्या कारवाईचा अहवाल आठ दिवसात सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक तारेणिया यांना दिले.
फालतू उत्तर देऊ नका; कारवाई करा!
हुंडी चिठ्ठी व्यवहारातून लुबाडणूक झाल्याची तक्रार २०१७ मध्ये जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे करण्यात आली; मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, अशी माहिती बैठकीत एका व्यक्तीने पालकमंत्र्यांना दिली. त्यानुषंगाने पालकमंत्र्यांनी यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक प्रवीण लोखंडे यांना विचारणा केली असता, जिल्हा उपनिबंधकांनी समाधानकारक उत्तर दिले नसल्याने, ‘फालतू उत्तर देऊ नका, धाडी टाकून कारवाई करा’ असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले.