सावरा फाट्यावर शेतक-यांचा ‘रास्ता रोको’
By admin | Published: June 5, 2017 02:07 AM2017-06-05T02:07:05+5:302017-06-05T02:07:05+5:30
बैलबंडी व जनावरे आणून रस्त्यावर कांदे फेकल्याने अकोट-अमरावती मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
अकोट : अकोट-अमरावती मार्गावरील सावरा फाट्यावर अचानक रविवारी शेतकर्यांनी ह्यरास्ता रोकोह्ण आंदोलन केले. यावेळी बैलबंडी व जनावरे आणून रस्त्यावर कांदे फेकल्याने वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी शेतकरीविरोधी भूमिका घेत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळण्यात आला. सावरा पंचक्रोशीतील मंचनपूर, आसेगाव, देऊळगाव, कवठा, पुंडा, रंभापूर आदी गावांतील शेतकर्यांनी एकत्र येऊन सरकारविरोधी घोषणा देत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आसेगाव बाजार येथील युवा शेतकरी संजय पुंडकर यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सात-बारा कोरा करा, दुधाला योग्य भाव द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शासनाने पशुधन विमा योजना पुन्हा सुरू करावी, शेतीसाठी अखंड मोफत वीज पुरवठा व ठिबक सिंचनला अनुदान मिळावे आदी मागण्यांकरिता आंदोलन छेडण्यात आले. ह्यरास्ता रोकोह्णमुळे एकच खळबळ उडाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहने अडकून पडली होती. आठवडी बाजारात अकोटला जाणारे व्यापारीसुद्धा अडकले होते. यावेळी शेतकर्यांनी अत्यावश्यक सेवा असलेली वाहने जाऊ दिली. आंदोलनामुळे मोठय़ा प्रमाणात वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी शेतकरी, शेतमजूर गावकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. दोन तासांनंतर वाहतूक सुरळीत झाल्याने अडकून पडलेल्यांनी नि:श्वास टाकला.
पोलिसांचे वरातीमागून घोडे
सावरा फाट्यावर शेतकर्यांनी अचानक एकत्र येऊन रास्ता रोको केला. या आंदोलनाची भनक नसल्याने पोलिसांना माहिती मिळू शकली नाही. रस्त्यावर बैलबंडी व जनावरे असल्याने प्रारंभी रास्ता रोको असल्याचे कोणाच्याही लक्षातच आले नाही. जनावरे व बैलबंडीमुळे वाहतूक विस्कळीत झाली, असे वाहनधारकांना वाटल्याने वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या; परंतु नंतर शेतकर्यांनी घोषणा देत कांदे रस्त्यावर फेकले, पुतळा जाळल्याने शेतकरी आंदोलन असल्याचे समजले. याबाबतची माहिती अकोट ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक अब्दागिरेसह पोलीस पोहोचले; मात्र तोपर्यंंत आंदोलन संपले होते. अखेर पोलिसांनी परत येऊन आंदोलनाची पोलीस डायरीत नोंद घेतली.
शेतकर्यांच्या संपास शेकापचा पाठिंबा
अकोला : संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी संप पुकारणार्या राज्यातील शेतकर्यांच्या आंदोलनास शेतकरी कामगार पक्षाने जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. शेतकरी वर्ग कमालीचा आर्थिक अडचणीत असून, कर्जाच्या बोजाखाली दबला आहे. शेतमालाला कवडीमोल भाव मिळत आहे. हमीभावात माल खरेदी करायला सरकार तयार नाही. अशा परिस्थितीत तातडीचा उपाय म्हणून सरसकट कर्जमाफी ही शेतकर्यांची मागणी आहे; परंतु सरकार याबाबत गंभीर नसून, टाळाटाळ करीत असल्यामुळे शेतकर्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकर्यांनी पुकारलेल्या या संपास व आंदोलनास शेकापचा पूर्ण पाठिंबा असून, या संपात शेकापच्या कार्यकर्त्यांंनी सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाचे विदर्भ विभाग चिटणीस प्रदीप देशमुख व जिल्हा चिटणीस दिनेश काठोके यांनी केले आहे.