खासगी कोविड सेंटरमध्ये होणारी कोरोना रूग्णांची लूट थांबवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:19 AM2021-03-08T04:19:12+5:302021-03-08T04:19:12+5:30
अकोला : जिल्ह्यात शासनाने खासगी कोवीड सेंटरमध्ये कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार करण्यास परवानगी दिली आहे. सध्या अकोला जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये ...
अकोला : जिल्ह्यात शासनाने खासगी कोवीड सेंटरमध्ये कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार करण्यास परवानगी दिली आहे. सध्या अकोला जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. त्यामुळे बरेच रूग्ण खासगी कोवीड उपचार केंद्रात दाखल होत आहेत. परंतु यापैकी अनेक केंद्रावर रूग्णांची अक्षरश: आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी रुग्णाच्या नातेवाईकांनी केल्या आहेत. नागरिकांची ही लूट त्वरित थांबविण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे छावा संघटनेचे जिल्हाप्रमुख शंकरराव वाकोडे यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली.
अनेक कोवीड सेंटरमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या दरांपेक्षाही जास्त रक्कम रूग्णांकडून वसूल करण्यात येत आहे. शासनाच्या आदेशप्रमाणे रूम केल्यानंतर त्यामध्येच दर समाविष्ट आहेत. त्यानुसार रक्त तपासणी, इसीजी, नर्सिंग, डॉक्टर व्हीजीट फी, आदीचा त्यात समावेश आहे. मात्र हेच चार्ज रूग्णांना बिल देताना पुन्हा लावण्यात येत आहे. त्यामुळे बिलाचा आकडा प्रचंड मोठा होवून रूग्णांची लूट होत असल्याचे दिसत आहे. याबाबत जिल्हाधिकार्यांनी एक समिती नेमून त्यांचेमार्फत ही केंद्र रूग्णांकडून किती पैसे काढत आहेत.
याची तपासणी करून घ्यावी जेणेकरून हा सर्व प्रकार उघडकीस येईल. व ज्या रूग्णांकडून जास्तीचे पैसे घेण्यात आले आहेत. त्यांना ते परत करण्यात यावेत, अशीही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या तपासणीत जी केंद्रे दोषी आढळतील त्यांची परवानगी रद्द करण्यात यावी, अशीही मागणी शंकरराव वाकोडे यांनी केली आहे.
सदर निवेदन सादर करताना छावाचे अरविंद कपले, अमोल हिंगणे, मनोहर मांगटे, अनिरूध्द भाजीपाले, आशू वानखडे, राजेश वाकोडे, बबलू वसतू, निखिल, नितीन चव्हाण, केतन लोखंडे, दीपक बिहाडे उपस्थित होते.