कर्तव्यात कसूर करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचा पगार थांबवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 01:22 PM2019-12-25T13:22:43+5:302019-12-25T13:22:58+5:30
ग्राहक सेवा तसेच कर्तव्यात कसूर करणाºया कर्मचाºयांवर पगार कपात करण्याची कारवाई करण्यात येईल, असे साबू यांनी स्पष्ट केले.
अकोला : वसुली ही महावितरणची जीवनवाहिनी असल्यामुळे ग्राहकांना वेळेत वीज बिल भरण्याची सवय लावा, थकबाकीदार ग्राहकांकडे वसुलीसाठी चकरा न मारता त्यांचा थेट वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करा, पुनर्जोडणी आकार भरल्यानंतर पुढील २४ तासांपर्यंत ग्राहकांना अंधारात राहावे लागू शकते, याची जाणीव करून द्या, असे न करणाºया कर्मचाºयांवर पगार थांबविण्यासारखी कारवाई करण्याचे निर्देश महावितरणचे संचालक (संचलन) दिनेशचंद्र साबू यांनी दिले.
अकोला विद्युत भवन येथे परिमंडळातील तीनही जिल्ह्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला मुख्य अभियंता अनिल डोये, अधीक्षक अभियंते पवनकुमार कछोट, दीपक देवहाते, विनोद बेथारिया यांच्यासह तीनही जिल्ह्यांतील कार्यकारी अभियंते प्रदीप पुनसे, अजय खोब्रागडे, प्रशांत दाणी, गजेंद्र गाडेकर, अनिल उईके, बद्रीनाथ जायभाये, दत्तात्रय साळी, रत्नदीप तायडे, नारायण लोखंडे, अविनाश चांदेकर, प्रणाली विश्लेषक राजेश दाभणे व वरिष्ठ व्यवस्थापक गणेश भंडारी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी साबू म्हणाले की, महावितरणच्या सुधारणात्मक धोरणानुसार आपल्याला नेमून दिलेल्या कार्यालयांतर्गत असलेली थकबाकी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार नाही, ज्यांच्या परिसरात रोहित्र जास्त निकामी होतात, वारंवार वीज पुरवठा खंडित होतो, वितरण हानी वाढत आहे, अशा कर्मचाºयांच्या वार्षिक गोपनीय आवाहनात याची नोंद घेतल्या जाईल. ग्राहक सेवा तसेच कर्तव्यात कसूर करणाºया कर्मचाºयांवर पगार कपात करण्याची कारवाई करण्यात येईल, असे साबू यांनी स्पष्ट केले.
औद्योगिक ग्राहकांसोबत संवाद
साबू यांनी अकोला इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष उन्मेश मालू, सह प्रतिनिधी मनोज खंडेलवाल, नितीन बियाणी, नरेश बियाणी, आशिष खंडेलवाल, आशिष चंदाराणा व संजय दालमिया यांच्याशी संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.
यावेळी औद्योगिक ग्राहकांनी महावितरणच्या ग्राहक सुविधेत झालेल्या बदलाबाबत समाधान व्यक्त करीत काही सूचना केल्या. यामध्ये नवीन वीज जोडणी त्वरित मंजूर करणे, पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी तीन दिवसांत वीज जोडणी देणे, नादुरुस्त रोहित्र तत्काळ बदलविणे, फक्त एमआयडीसी परिसराकरिता स्पेशल शाखा अधिकारी उपलब्ध करू देण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी साबू यांनी राबवित असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती देत एमआयडीसी ग्राहकांच्या सुविधेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्या जातील, असे आश्वस्त केले.