उघड्यावरील मांस विक्री बंद करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:18 AM2021-03-06T04:18:20+5:302021-03-06T04:18:20+5:30

अकाेटफैल चाैकात नाला तुंबला अकाेला : मनपातील स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षामुळे वर्दळीच्या असलेल्या अकाेटफैल चाैकातील मुख्य नाला घाणीने व कचऱ्याने ...

Stop selling meat in the open! | उघड्यावरील मांस विक्री बंद करा!

उघड्यावरील मांस विक्री बंद करा!

Next

अकाेटफैल चाैकात नाला तुंबला

अकाेला : मनपातील स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षामुळे वर्दळीच्या असलेल्या अकाेटफैल चाैकातील मुख्य नाला घाणीने व कचऱ्याने तुडुंब साचला आहे. यामुळे परिसरातील व्यावसायिक, रहिवासी त्रस्त झाले आहेत. नाल्याची तातडीने साफसफाई करण्याची गरज असून यासंदर्भात व्यावसायिकांनी मनपाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता

अकाेला : डाबकी राेडवरील शिवाजी नगरस्थित भाजी बाजार ते श्रीवास्तव चाैकापर्यंत भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामासाठी खाेदकाम करण्यात आले. यावेळी श्रीवास्तव चाैकाच्या बाजूला खाेदण्यात आलेला खड्डा जैसे थे असल्यामुळे दुचाकीचालकांच्या जीवाला धाेका निर्माण झाला आहे. या प्रकाराकडे मनपा प्रशासन व प्रभागातील नगरसेवकांचे दुर्लक्ष हाेत आहे.

आराेग्य निरीक्षक सुस्तावले

अकाेला : शहराच्या कानाकाेपऱ्यात हाेणाऱ्या साफसफाईच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी मनपा प्रशासनाने स्वच्छता व आराेग्य विभागात आराेग्य निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. सफाई कर्मचाऱ्यांना काेणत्याही सूचना दिल्या जात नसल्याने शहरात ठिकठिकाणी घाण साचल्याचे दिसत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.

पथदिवे सुरू करा!

अकाेला : प्रभाग क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या नायगाव परिसरातील वस्त्यांमध्ये अद्यापही महापालिका प्रशासनाने पथदिव्यांसाठी विद्युत खांब उभारले नाहीत. यामुळे परिसरातील रहिवाशांना रात्री अंधाराचा सामना करावा लागत असून ही समस्या दूर करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे केली आहे.

सांडपाणी तुंबले; नागरिक त्रस्त

अकाेला : प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत येणाऱ्या गंगानगर व कायनात परिसरात नाल्यांची साफसफाई हाेत नसल्यामुळे नाल्यांमधील घाण सांडपाणी रस्त्यांवर साचले आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून प्रभागातील नगरसेवक फिरकूनही पाहत नसल्यामुळे नागरिकांमध्ये राेष व्यक्त केला जात आहे.

जनजागृतीसाठी मनपा सरसावली

अकाेला : मागील काही दिवसांपासून शहरात पुन्हा एकदा काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत माेठी वाढ हाेत चालली आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव पाहता जनजागृतीसाठी महापालिका प्रशासन सरसावल्याचे चित्र आहे. चाचणीदरम्यान पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांनीसुध्दा साेशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे झाले आहे.

अकाेलेकरांची नियमांकडे पाठ

अकाेला : शहरात काेराेनाचा प्रसार झपाट्याने हाेत असून काेराेना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याची सूचना वारंवार केली जात असतानादेखील नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. मनपाच्या सूचनांकडे अकाेलेकर कानाडाेळा करीत असल्याचे दिसून येत आहे.

चाचणीसाठी पुढाकार घ्या

अकाेला : वातावरणातील बदलामुळे अकाेलेकरांना सर्दी, खाेकला, अंगदुखी आदी संसर्गजन्य आजारांनी बेजार करून साेडले आहे. शहरात विविध आजारांची साथ पसरली असताना नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र समाेर आले आहे. काेराेनाची लक्षणे व साध्या सर्दीच्या लक्षणांमध्ये साम्य असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता काेराेना चाचणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

अतिक्रमकांना हुसकावले

अकाेला : शहरातील मुख्य रस्त्यांलगत अतिक्रमण थाटल्यास कारवाईचा इशारा महापालिकेने दिला असून दरराेज अतिक्रमण हटाव माेहीम राबवली जात आहे. यादरम्यान, शुक्रवारी गांधी चाैकात रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या अतिक्रमकांना हुसकावण्याची कारवाई करण्यात आली. पुन्हा दुकाने थाटल्यास साहित्य जप्त करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

रस्त्यांवर धुळीचे ढीग; वाहनधारक त्रस्त

अकाेला : शहरातील प्रमुख रस्त्यांची मनपातील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दैनंदिन साफसफाई करणे क्रमप्राप्त असताना कर्मचाऱ्यांकडून थातूरमातूर साफसफाई केली जात असल्याचे चित्र आहे. रस्त्यांची झाडपूस केल्यानंतर जमा झालेली धूळ ट्रॅक्टरमध्ये जमा न करता दुभाजकांलगत ढीग लावले जात असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

Web Title: Stop selling meat in the open!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.