'वखार'च्या गोदामातून खराब गव्हाची उचल थांबविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 03:17 PM2019-04-05T15:17:09+5:302019-04-05T15:17:17+5:30

सोबतच गुणवत्ता तपासणी प्राप्त झाल्याशिवाय गव्हाची उचल केली जाणार नाही, ही बाबही जिल्हाधिकाऱ्यांनी एफसीआय, सीडब्ल्यूसीच्या वरिष्ठांना कळविली आहे.

Stop the supply of poor wheat from 'Warehouse' | 'वखार'च्या गोदामातून खराब गव्हाची उचल थांबविली!

'वखार'च्या गोदामातून खराब गव्हाची उचल थांबविली!

googlenewsNext

अकोला: जिल्ह्यातील लाभार्थींना वाटप करण्यासाठी ‘एफएक्यू’ दर्जाचा गहू पुरवठा करण्याचे पत्र जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्यानंतरही गहू केंद्र शासनाच्या एफएक्यू निकषाचा असल्याचे सांगत त्याचा पुरवठा एफसीआयने सीडब्ल्यूसीच्या गोदामातून सुरू केला. त्यानंतर पातूर, बाळापूरसह जिल्ह्यातील सर्वच गोदामात खराब गव्हाचा पुरवठा करीत थेट जिल्हाधिकाऱ्यांचीच दिशाभूल करण्याचा प्रकार या दोन्ही यंत्रणांनी केला आहे. याप्रकरणी त्यांना पत्राद्वारे जाब विचारला जात असल्याचे संकेत आहेत. सोबतच गुणवत्ता तपासणी प्राप्त झाल्याशिवाय गव्हाची उचल केली जाणार नाही, ही बाबही जिल्हाधिकाऱ्यांनी एफसीआय, सीडब्ल्यूसीच्या वरिष्ठांना कळविली आहे.
एफसीआयने (भारतीय खाद्य निगम) भाड्याने घेतलेल्या सीडब्ल्यूसीच्या (केंद्रीय वखार महामंडळ) गोदामात गव्हाचा साठा करणे सुरू झाले. फेब्रुवारीपासून मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथून या गोदामात गहू आणला जात आहे. दरम्यान, ४ -५ मार्च रोजी गोदामातील साठा ७० हजार पोत्यांपर्यंत पोहोचला. त्यावेळी काही पोती फाटली, काही अनवधानाने फुटली. त्यामध्ये असलेला गहू खापरा कीडग्रस्त, पाण्याने भिजलेला, १७ टक्क्यांपेक्षाही अधिक आर्द्रतेचा असल्याचे वरिष्ठ गोदाम व्यवस्थापकांना आढळले. त्यांनी तातडीने एफसीआयच्या भोपाळ, नागपूर, सीडब्ल्यूसीच्या मुंबईतील प्रादेशिक व्यवस्थापकांना माहिती दिली. पत्रात गव्हाची अवस्था नमूद केली. सोबतच गोदामातील ७० हजारांपैकी किती पोत्यातील गहू खराब आहे, ही बाब बाह्यदर्शनी सांगता येत नाही. प्रत्येक पोते तपासून पाहणेही शक्य नाही, त्यामुळे गव्हाच्या साठ्याबाबतचा निर्णय घेण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीवर एफसीआयच्या मुंबईतील प्रादेशिक कार्यालयाने गुणवत्ता निरीक्षक पी. के. बिहारी यांना तातडीने अकोल्यात पाठविले. त्यांनी १५ मार्च रोजी अवघ्या तीन तासांत पाहणी करीत अहवाल सादर केला. त्या अहवालानुसार एफसीआयचे नागपूर येथील प्रादेशिक व्यवस्थापक किशोरीलाल यांनी वखारच्या गोदामातील गहू केंद्र शासनाच्या निकषात एफएक्यू दर्जाचा असल्याचे पत्र जिल्हाधिकाºयांना दिले, तसेच गव्हाची उचल सुरू करण्याचेही म्हटले. उचल सुरू झाल्यानंतर बाळापूर, पातूरसह जिल्ह्यातील सर्वच गोदामात खराब गव्हाचे पोते आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे गोदामातील गहू खराब असताना त्याची उचल करण्यासाठी एफएक्यू दर्जाचा असल्याचे पत्र एफसीआयच्या प्रादेशिक व्यवस्थापकांनी देत जिल्हाधिकाºयांची ऐन निवडणुकीच्या धामधुमीत दिशाभूल करण्याचा प्रकार घडला आहे.
त्यापूर्वी वखारच्या गोदामातून पुढील आदेशापर्यंत उचल थांबविण्याचे पत्र जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. आर. पी. वानखेडे यांनी दोन्ही व्यवस्थापनांना गुरुवारी देण्यात आले.

 

Web Title: Stop the supply of poor wheat from 'Warehouse'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला