आर्थिक तणावामुळे गतप्राण शेतकºयाच्या अस्थी विसर्जन थांबवले !
By admin | Published: June 23, 2017 04:02 PM2017-06-23T16:02:16+5:302017-06-23T16:03:01+5:30
शोकमग्न कुटूंबाने मयत शेतकºयाच्या अस्थिचे विजर्सन न करण्याचा निर्णय घेतला आहे.
कुटूंबातील सदस्यांचा निर्णय : शासनाने दखल घेण्याची ग्रामस्थांची मागणी
संतोषकुमार गवई
शिर्ला (अकोला) -कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या किसन दगडू बळकार या ५८ वर्षीय शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने २२ जून रोजी दुपारी १२ वाजता अचानक मृत्यू झाला. ही आत्महत्या नसली तरी शेतकऱ्यांवर कर्जाचा किती ताण आहे हे या निमित्ताने स्पष्टपणे समोर आले आहे त्यामुळे शासनाने या शेतकऱ्याच्या निधनाची तत्काळ दखल घेऊन सदर शेतकरी कुटूंबाला मदत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शोकमग्न कुटूंबाने मयत शेतकऱ्याच्या अस्थिचे विजर्सन न करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिर्ला येथील शेतकरी किसन दगडू बळकार (५८) हे पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असलेल्या मुलाला पैसे पाठविण्यासाठी तजवीज करण्यासाठी गुरुवारी दुपारी १२ वाजता दुकानदार भीमराव ढाळे यांच्याकडे गेले होते. सदर दुकानदाराने पाच हजार रुपयांची मदत केली. तथापि, गतवर्षीचे ५० हजार रुपयांचे थकीत पीक कर्ज, सावकाराकडून घेऊन थकीत असलेले कर्ज, पेरणीसाठी जवळ पैसा नसणे, गतवर्षी सोयाबीनची कवडीमोल भावाने केलेली विक्री, यामुळे ते प्रचंड आर्थिक विवंचनेत होते. त्यांच्या शेतात गतवर्षी पाच क्विंटल सोयाबीन पिकले होते. ते कवडीमोल भावाने विकले गेले.त्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी गुजरात राज्यात स्थलांतर केले होते. तेथे उसाच्या रसवंतीचा दांडा ओढून परिवाराची गुजराण केली. पावसाळा तोंडावर आल्याने ते पेरणीसाठी कुटुंबासह गावी परतले होते; परंतु काही दिवसांपासून पावसानेही दांडी मारल्याने ते चिंताग्रस्त झाले होते. या विविध विवंचनांच्या परिणामी किसन बळकार यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्याच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी ५ वाजता शिर्ला येथे सुवर्ण नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विदर्भातील प्रथेप्रमाणे अंत्यसंस्काराच्या दूसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाही ९ वाजता सुवर्ण नदि काठावर अस्थी संकलीत करण्यासाठी नातेवाईक एकत्रित आले होते.त्या सर्वांनी शासनाप्रती रोष व्यक्त केला आहे. कर्जमाफीचा निर्णय तत्काळ लागु झाला असता तर कदाचित शेतकरी बळकार यांचे प्राण वाचू शकले असते अशी भावना ग्रामस्थांची आहे. मयत शेतकरी किसन दगडु बळकार ह्यांचे पश्चात पत्नी वच्छलाबाई किसन बळकार ह्यांचेवर जबाबदारी आली आहे. कुटूंबावर असलेल्या कर्जाचे ओझे तसेच मुलांच्या शिक्षणाचा खर्च त्याबरोबरच पेरायची राहलेली शेती त्यासाठी नसलेला पैसा ह्या दृष्टचक्रातुन बाहेर पडण्यासाठी शासनाने मदत करण्याची नितांत गरज आहे. बळकार ह्यांचे परिवाराला शासनाने भरीव मदत करावी यासाठी ग्रामस्थ तहसीलदारांना निवेदन देणार आहेत.