नियमबाह्य कीटकनाशकांचा केला साठा; कृषी विभागाची पोलिसात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 01:08 PM2018-08-29T13:08:44+5:302018-08-29T13:10:39+5:30
अकोला: नियमबाह्य कीटकनाशकांचा साठा केल्याप्रकरणी कृषी विभागाच्या गुण नियंत्रण विभागाने मंगळवारी दोन एन्टरप्रायजेस व एका कंपनीविरोधात रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
अकोला: नियमबाह्य कीटकनाशकांचा साठा केल्याप्रकरणी कृषी विभागाच्या गुण नियंत्रण विभागाने मंगळवारी दोन एन्टरप्रायजेस व एका कंपनीविरोधात रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ही तक्रार कायदेविषक पडताळणीसाठी पाठविली आहे.
एका कंपनीने विदर्भातील आपल्या एका वितरकाकडून कीटकनाशके मागविली होती. ती कीटकनाशके बोगस असल्याचा ठपका सुरुवातीला मोहीम अधिकारी व गुण नियंत्रण विभागाने ठेवून कीटकनाशके कायदा १९६८ चे कलम २१ (१) अन्वये सदर साठा विक्री बंदचा आदेश दिला होता. यासंदर्भात इमामॅक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी (मिसाइल) या कीटकनाशकांचे नमुने १ आॅगस्ट २०१८ रोजी घेऊन ४ आॅगस्ट २०१८ रोजी अमरावती येथील कीटकनाशक विश्लेषण कार्यशाळेत पाठविण्यात आले होते. तसेच बुरशीनाशक कार्बेनडेझिम ५० टक्के डब्ल्यू.पी. (बाविस्टीन) चे नमुने ४ आॅगस्ट २०१८ रोजी घेऊन ६ आॅगस्ट २०१८ रोजी अमरावतीच्या प्रयोगशाळेत चाचणी घेण्यासाठी पाठविले होते. या साठ्याच्या अभिलेखाची तपासणी अकोल्यातील एन्टरप्रायजेसकडे केली असता. सदरचा कीटकनाशकांंचा साठा प्रधान प्रमाणपत्रानुसार न घेता नागपूरच्या एका एन्टरप्रायजेसकडून खरेदी करण्यात आल्याचे समोर आल्याने तसा तपासणी अहवाल देऊन सदर एन्टरप्रायजेसला सात दिवसात खुलासा मागविला होता व कीटकनाशके विक्री बंदचे आदेश देण्यात आले होते.
दरम्यान, ७ आॅगस्ट २०१८ रोजी जिल्ह्यातील भरारी पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळाचा पंचनामा केला असून, हा साठा जप्त करू न साठ्याची विक्री किंवा विल्हेवाट न लावण्याच्या अटीवर अकोल्याच्या एन्टरप्रायजेसच्या ताब्यात देण्यात आला. असे असले तरी अकोला कृषी विभागाने केलेल्या चाचणीत ते उत्पादन स्वीकृत (पास) ठरल्याचे समोर आले आहे; पण कीटकनाशक कायदा १९६८ च्या कलम २९ (२) व कीटकनाशक नियम १९७१ च्या नियम १० (४)(ए)(।) चे उल्लंघन केल्याने शिक्षेस पात्र ठरत असल्याने २४ आगस्ट रोजी अकोला येथील विद्यमान न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हे प्रकरण पुढील आदेश मिळेपर्यंत दाखल करण्यात आले आहे.
-आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली आहे. यासंदर्भात कायदेशीर पडताळणी करू न पुढील कारवाई करण्यात येईल.
शैलेश सपकाळ,
ठाणेदार,
रामदासपेठ पोलीस ठाणे,
अकोला.