७० लाखांच्या धान्य घोटाळ्यातील भांडारपाल जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 02:26 PM2020-03-15T14:26:32+5:302020-03-15T14:26:38+5:30
न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
अकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळामध्ये असलेल्या राज्य वखार महामंडळाच्या गोदामातील धान्याची पोती गायब करीत तब्बल ७२ लाख रुपयांचा घोटाळा करणारा भांडारपाल मनोज टीकाराम बुंदेले याला एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
राज्य वखार महामंडळाचे भांडारपाल सचिन ढवळे यांनी २१ एप्रिल २०१९ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार नोव्हेंबर २०१४ ते मार्च २०१७ या कालावधीत भांडारपाल असलेला मनोज टीकाराम बुंदेले याने त्याच्या कार्यकाळात वखार महामंडाळाच्या गोदामातील ३ हजार १३९ पोती गहू, एक हजार ४९३ पोती तांदूळ असा एकूण ६३ लाख ५० हजार ९६६ रुपयांचा धान्य घोटाळा, तर याव्यतिरिक्त ७ लाख ९ हजार ८२२ रुपयांचा अग्रिम खर्चाचा हिशेब बुंदेले याने दिला नाही. यासोबतच ग्रे क्लॉथ बेलचे १ लाख ४७ हजार ६७३ रुपयांचे देयक बुंदेले याच्या हलगर्जीमुळे नामंजूर करण्यात आले. यासोबतच पाण्याच्या देयकामध्ये १२ हजार रुपयांचा घोळ असा एकूण ७२ लाख २० हजार ७७३ रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी मनोज टीकाराम बुंदेले याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४०६, ४०८, ४०९, ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी तेव्हापासून फरार असताना एमआयडीसी पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत असताना सदर आरोपीची माहिती मिळताच एमआयडीसीचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी आरोपीस शुक्रवारी अटक केली. त्यानंतर आरोपी मनोज टीकाराम बुंदेले याला प्रथम श्रेणी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या आरोपीने मंगरूळपीर येथेही अशाच प्रकारचा घोळ केल्याची माहिती असून, पोलिसांनी त्या दिशेने तपास केल्यास आणखी रॅकेट बाहेर येण्याची शक्यता आहे.