प्रणव अवतार महोत्सवाची सांगता
By admin | Published: February 8, 2016 02:37 AM2016-02-08T02:37:37+5:302016-02-08T02:37:37+5:30
मेहकरसह दिल्ली, वाराणसी आदी ठिकाणीही कार्यक्रम.
ब्रम्हानंद जाधव/मेहकर (जि. बुलडाणा) : विदर्भात वारकरी भक्तीपरंपरेचे बीजारोपण करणारे आणि कपाळी बुक्क्या सोबत अष्टगंध लावण्याची प्रथा रुढ करणारे मेहकर जन्मस्थळ असलेले संत बाळाभाऊ महाराज पितळे यांचा प्रणव अवतार महोत्सव येथील श्रीक्षेत्र ज्ञानमंदिर परिसरात ७ फेब्रुवारी रोजी पार पडला. परराज्यातही संत बाळाभाऊ महाराजांच्या भक्तांनी हा उत्सव साजरा केला. मेहकर येथे सन १८८८ ला जन्मलेले थोर संत बाळाभाऊ महाराज पितळे उर्फ श्वासानंद सरस्वती यांनी जातीभेद निर्मुलन, धर्मशुद्धीकरण व समाजपरिवर्तनासाठी लक्षणीय कार्य केले. नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय व वारकरी संप्रदायाचा त्यांनी त्रिवेणी संगम घडवून आणला. संत बाळाभाऊ महाराजांनी नेपाळसह देशभरात अविरत संचार करुन शेकडो नामसप्ताह, यज्ञ सोहळे, पायी वारी, चातुर्मास यामाध्यमातून भक्तीप्रसाराची ध्वजा फडकविली. महाराजांना नेपाळच्या राजघराण्याकडून पार्थिव लिंगपूजनाचा दुर्मिळ सन्मान मिळाला होता. त्यांनी उत्तरप्रदेशातल्या चित्रकूट येथे ह्यत्रिदंडी संन्यासह्ण घेऊन मध्यप्रदेशातल्या ओंकारेश्वर व महेश्वरच्या घनदाट अरण्यात ह्यकरतल भिक्षा, तरूतल वासह्ण ही तपश्चर्या केली. महाराणी अहिल्याबाई होळकरांचे राजवारस मार्तंडराव होळकर यांनी संत बाळाभाऊ महाराजांचे शिष्यत्व पत्करले होते. अवघ्या ४२ वर्षांच्या जीवनकालात चारही आश्रमांचे पालन करुन परमहंस दीक्षा घेऊन त्यांनी उत्तरप्रदेशातल्या वाराणसी येथे संजीवन समाधी घेतली. महाराजांना मानणारा भक्तवर्ग आज महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशातही विखुरला आहे. त्यांच्या गुरूगादीवरील विद्यमान श्रीगुरू अँड. रंगनाथ महाराज पितळे यांच्या उपस्थितीत मेहकर येथे तसेच दिल्ली, वाराणसीसह अन्य ठिकाणी महोत्सवानिमित्त कीर्तने, प्रवचने, दिंडी परिक्रमा, हरिपाठ, काकडा, गोलरींगण, भारूडे, महाप्रसाद अश्या भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल होती.