शौचालयांमधील मैल्यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘एसटीपी’ उभारणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:19 PM2019-11-16T12:19:58+5:302019-11-16T12:20:04+5:30
नागपूर येथील निरी संस्थेने मान्यता दिल्यानंतर शासनाने ‘एसटीपी’च्या उभारणीचे निर्देश जारी केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयांची उभारणी केल्यानंतर शौचालयांच्या सेप्टिक टँकमधील मैल्याचे सुरक्षित व नियमित व्यवस्थापन करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘एसटीपी’(सिवरेज ट्रीटमेंट प्लांट)ची उभारणी करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने जारी केले आहेत. मैल्यावर प्रक्रिया करण्यासाठी अहमदाबाद येथील पर्यावरण नियोजन व तंत्रज्ञान संस्थेने सुचविलेल्या ‘स्लज ड्राइंग बेड’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याला शासनाने मंजुरी दिली आहे.
‘स्वच्छ भारत’ अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात उघड्यावर शौच करणाऱ्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना वैयक्तिक शौचालय बांधून देण्याचे नागरी स्वायत्त संस्थांना निर्देश होते. नागरिकांना वैयक्तिक तसेच अद्ययावत सार्वजनिक शौचालयांची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर शहरांना हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट होते.
यादरम्यान, शहरातील घनकचºयाचे व्यवस्थापन करून शहरे ‘स्वच्छ’ करण्याचाही समावेश होता. संबंधित शहरांमध्ये दोन्ही सुविधांची पूर्तता केल्यानंतर त्यांना ‘ओडीएफ प्लस’चा दर्जा दिला जात आहे.
शौचालयांची उभारणी करणे इथपर्यंतच न थांबता शौचालयांच्या सेप्टिक टँकमधील मैल्याचे सुरक्षित व नियमित व्यवस्थापन करणे तसेच त्यावर प्रक्रिया करून संबंधित शहरांना ‘ओडीएफ प्लस’चा दर्जा प्राप्त आवश्यक आहे.
त्यासाठी राज्य शासनाने मैल्यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘एसटीपी’ची उभारणी करण्याच्या अनुषंगाने अहमदाबाद येथील पर्यावरण नियोजन व तंत्रज्ञान संस्थेचा अभिप्राय घेतला असता, माफक किमतीत आणि सहज परवडणाºया ‘स्लज ड्राइंग बेड’ (एसडीबी) तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे सुचविले. या तंत्रज्ञानाला नागपूर येथील निरी संस्थेने मान्यता दिल्यानंतर शासनाने ‘एसटीपी’च्या उभारणीचे निर्देश जारी केले आहेत.
(प्रतिनिधी)