निधीत अडकली पाणीटंचाईची देयके
By admin | Published: July 13, 2015 01:56 AM2015-07-13T01:56:09+5:302015-07-13T01:56:09+5:30
तीन कोटींची देयके प्रलंबित; मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर.
अकोला: जिल्हय़ातील पाणीटंचाई निवारणासाठी जून अखेरपर्यंत जिल्हय़ात करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या कामांची तीन कोटी आठ लाख ४८ हजार रुपयांची देयके अद्याप प्रलंबित असून, शासनाकडून निधी उपलब्ध नसल्याने पाणीटंचाई निवारणाच्या कामांची देयके अडकली आहेत. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्हय़ातील विविध भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी ४५८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या ५८२ उपाययोजनांच्या कृती आराखड्यास डिसेंबर २0१४ मध्ये जिल्हाधिकार्यांकडून मंजुरी देण्यात आली होती. कृती आराखड्यातील उपाययोजनांच्या कामांसाठी ११ कोटी ८३ लाख ३२ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला होता. पाणीटंचाई कृती आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी जून अखेरपर्यंत जिल्हय़ातील १९९ गावांमध्ये १५६ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात करण्यात आली. ग्रामपंचायती आणि खासगी कंत्राटदरांकडून पूर्ण करण्यात आलेल्या पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांच्या कामांपैकी १५१ उपाययोजनांच्या कामांची देयके प्रलंबित आहेत. गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत जिल्हय़ात पाणीटंचाई निवारणाच्या पूर्ण करण्यात आलेल्या कामांच्या देयकांपोटी आवश्यक असलेला निधी अद्याप शासनाकडून उपलब्ध झाला नाही. कामांची देयके अदा करण्यासाठी आवश्यक असलेल्या तीन कोटी आठ लाख ४८ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करण्याबाबत जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकार्यांकडे मागणी करण्यात आली. त्यानुसार निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला; मात्र निधी उपलब्ध झाला नसल्याने, पाणीटंचाई निवारणाच्या कामांची देयके अद्यापही प्रलंबित आहेत. त्यानुषंगाने पाणीटंचाई निवारणाच्या कामांची देयके अदा करण्यासाठी शासनाकडून निधी केव्हा उपलब्ध होणार, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.