अकोला शहरातील पथदिवे दिवसा सुरू; रात्री बंद; मनपाचा कारभार ढेपाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 04:11 PM2019-08-20T16:11:36+5:302019-08-20T16:11:43+5:30
एलईडी पथदिव्यांच्या व्यतिरिक्त इतर मुख्य मार्गांवरील पथदिव्यांची समस्या कायम असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरातील पथदिव्यांचे ‘टायमर’ बिघडण्यासोबतच महावितरण कंपनीच्यावतीने मनपाच्या पथदिव्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणारी अतिरिक्त विद्युत तार उपलब्ध नसल्यामुळे भरदिवसा पथदिवे सुरू राहत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
शहरातील बहुतांश भागात रात्रंदिवस पथदिवे सुरू राहत असल्याचा आर्थिक भुर्दंड अकोलेकरांवर पडत असून, महावितरणच्यावतीने विजेचा अतिरिक्त अधिभार त्या-त्या प्रभागातील नागरिकांवर आकारला जात असल्याचे बोलल्या जात आहे. या प्रकाराकडे मनपाच्या विद्युत विभागाचे दुर्लक्ष होत असतानाच सत्ताधारी भाजपही झोपेत असल्याचे दिसून येत आहे.
शहरात नव्याने तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांवरील एलईडी पथदिव्यांच्या व्यतिरिक्त इतर मुख्य मार्गांवरील पथदिव्यांची समस्या कायम असल्याचे चित्र आहे. पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने झोननिहाय कंत्राटदारांची नियुक्ती केली. पथदिवे देखभाल दुरुस्तीच्या बदल्यात झोननिहाय सुमारे तीन-साडेतीन लाख रुपये अदा केले जातात. अर्थात, पथदिव्यांवर महिन्याकाठी १२ लाख रुपये खर्च होत असले, तरी शहरातील मुख्य मार्गांवर अद्यापही नादुरुस्त पथदिव्यांची संख्या मोठी असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील बंद पथदिव्यांच्या संदर्भात मनपाच्या विद्युत विभागाने सविस्तर माहिती ठेवणे अपेक्षित आहे. तसे होत नसल्यामुळेच कंत्राटदारांचे फावत असून, नादुरुस्त पथदिव्यांची १५-१५ दिवसांतही दुरुस्ती केली जात नसल्याची परिस्थिती आहे.
‘टायमर’ बिघडले; विजेची उधळपट्टी
महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून शहरात ‘एलईडी’च्या कामांचा गवगवा केला जात असतानाच दुसरीकडे पथदिव्यांचे ‘टायमर’ बिघडल्यामुळे पथदिव्यांचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. मुख्य रस्त्यांवरील पथदिवे दिवसा सुरू अन् रात्री बंद राहत असल्याने महापालिकेने नियुक्त केलेले झोननिहाय कंत्राटदार दिवसभर करतात तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे. काही भागात पथदिवे चोवीस तास सुरू राहतात. त्यावर होणारी विजेची अनावश्यक उधळपट्टी टाळण्यासाठी सत्ताधारी व प्रशासन उपाययोजना करतील का, याकडे सुज्ञ अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.
हा भुर्दंड अकोलेकरांच्या मस्तकी!
महावितरण कंपनीने विद्युत तार उपलब्ध करून दिल्यास त्यावर मनपाला टायमर लावता येते. प्रभागातील कोणत्या भागात विजेचा किती वापर झाला, याची महावितरणकडे नोंद राहते.
‘टायमर’अभावी पथदिवे दिवसा सुरू राहत असल्याने वीज देयक वाटप करताना त्या-त्या परिसरातील वीज ग्राहकांवर अतिरिक्त अधिभार लादून त्या बदल्यात वीज देयकाचे पैसे वसूल केल्या जात असल्याची माहिती आहे.
अर्थात, मनपाच्या भोंगळ कारभारामुळे हा आर्थिक भुर्दंड अकोलेकरांना सहन करावा लागत आहे. यावर महापौर विजय अग्रवाल ठोस तोडगा काढतील का, असा सवाल सर्वसामान्य अकोलेकर उपस्थित करीत आहेत.