पथदिव्यांचे ‘टायमर’ बिघडले; मुख्य रस्त्यांवर अंधार; मनपाचा विद्युत विभाग झोपेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 02:52 PM2018-10-09T14:52:56+5:302018-10-09T14:54:09+5:30
अकोला : सत्ताधारी भाजपाच्यावतीने शहरात एलईडी पथदिव्यांचा गवगवा केला जात असला, तरी महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कुचकामी धोरणामुळे मुख्य रस्ते अंधारात असल्याचे चित्र आहे. पथदिव्यांचे ‘टायमर’ बिघडल्यामुळे की काय, रस्त्यांवर दिवसा उजेड अन् रात्री अंधार पसरत असल्याची परिस्थिती आहे. मुख्य रस्त्यांवरील अंधार पाहता मनपाचा विद्युत विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येत आहे.
महापालिका प्रशासनाने शहरातील मुख्य मार्गावर एलईडी पथदिवे तर मुख्य ४५ चौकांमध्ये हायमस्ट पथदिवे लावण्याचा कंत्राट पुणे येथील कंपनीला दिला आहे. या कामासाठी मनपाच्या चौदाव्या वित्त आयोगातून दहा कोटी रुपये तसेच आ. रणधीर सावरकर यांनी शासनाकडून मिळविलेल्या दहा कोटी रुपयांचा समावेश आहे. एकूण २० कोटी रुपयांतून होणाºया कामात मुख्य रस्ते उजळून निघणार असून, आजवर ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मनपाच्या विद्युत विभागाने झोननिहाय खासगी कंत्राटदारांची नियुक्ती केली असून, त्यावर देखरेख ठेवण्यासाठी आउटसोर्सिंगमार्फत नियुक्त केलेल्या कनिष्ठ अभियंत्यांवर जबाबदारी सोपविली आहे. पथदिव्यांसंदर्भात एवढा मोठा लवाजमा असताना आज रोजी मुख्य मार्गावरील पथदिवे नादुरुस्त असल्याचे चित्र समोर आले आहे. यामध्ये प्रामुख्याने निमवाडी चौक ते कमला वाशिम बायपास चौक ते थेट राष्ट्रीय महामार्गावरील किराणा बाजार, लोखंडी पूल, भांडपुरा चौक ते जुना बाळापूर रोड ते नाका, नेहरू पार्क चौक ते रामलता सेंटर, नेहरू पार्क ते सिव्हिल लाइन चौक आदींसह अंतर्गत रस्त्यांचा समावेश आहे.
विद्युत विभागाचा कारभार ढेपाळला!
शहरात क ोट्यवधी रुपये खर्च करून एलईडी पथदिवे, हायमस्ट लाइट लावल्या जात आहेत. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली महापालिकेच्या विद्युत विभागाने विविध कंत्राटदारांची नियुक्ती करून जाणीवपूर्वक गोंधळाची स्थिती निर्माण केल्याचे दिसून येते. या विभागासाठी आउटसोर्सिंगच्या माध्यमातून कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती केली असली, तरी एकूण चित्र पाहता विद्युत विभागाचा कारभार ढेपाळल्याचे चित्र आहे.
नागरिकांमध्ये सत्ताधाºयांप्रती नाराजी
अकोलेकरांना मनपाकडून पाणी पुरवठा, पथदिवे, प्रशस्त रस्ते व स्वच्छता आदी मूलभूत सुविधांची अपेक्षा आहे. भाजपावर विश्वास ठेवून नागरिकांनी मनपाची सत्ता भाजपाच्या ताब्यात दिली असली, तरी पथदिव्यांची उडालेली दाणादाण पाहता सत्ताधाºयांप्रती नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
तक्रारींचे निरसन का नाही?
सद्यस्थितीत मुख्य रस्त्यांसह प्रभागातील अंतर्गत रस्त्यांवरही एलईडी पथदिवे लावण्यात आले आहेत. देखभाल दुरुस्तीअभावी यातील अनेक लाइट बंद स्थितीत आढळून येतात. यासंदर्भात मनपाच्या विद्युत विभागाकडे अथवा संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना मौखिक सूचना दिल्यानंतरही तक्रारींचे निरसन होत नसल्याचे वारंवार समोर येत आहे. प्राप्त तक्रारींचे निरसन का होत नाही, यामागे कंत्राटदार व कनिष्ठ अभियंत्यांचे काही साटेलोटे आहे का, असे विविध प्रश्न निर्माण होत आहेत.