अकोट शहरात रस्त्यावर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:19 AM2021-04-11T04:19:00+5:302021-04-11T04:19:00+5:30
अकोटः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या वीकेंड लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी तालुक्यात व शहरात रस्त्यावर शुकशुकाट होता. नागरिकांनी घरातच ...
अकोटः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या वीकेंड लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी तालुक्यात व शहरात रस्त्यावर शुकशुकाट होता. नागरिकांनी घरातच राहणे पसंत केल्याचे शनिवारी दिसून आले. सकाळच्या सुमारास नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती; मात्र प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच अनेकांनी घरची वाट धरली.
शनिवार व रविवार या दोन दिवशी वीकेंड लाॅकडाऊन असल्याने काय सुरू राहणार, याबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम कायम होता. शनिवारी शहरातील किराणा दुकाने, फळविक्रेता, वैद्यकीय सेवा, मेडिकल व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती. दरम्यान, बँक व बसस्थानकात गर्दी दिसून आली. एसटी बस सेवा सुरू असल्याने अनेकांनी प्रवास केला.
विशेष म्हणजे वीकेंड लॉकडाऊनमुळे वाहनांची संख्या कमी असल्याचा फायदा घेत शहरातील रस्त्याचे काम करून घेण्यात आले. शहरातील काही भागात दुकानाचे शटर बंद करून दुकाने सुरू होती.
-------------------------
शहरात प्रतिबंधक क्षेत्र घोषित
शहरात दि. १ ते ४ एप्रिलदरम्यान दोन किंवा त्यापेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला परिसर प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. त्यामध्ये वणी वेटाळ, खानापूर वेस, सोमवार वेस, सनसिटी, जेतवन नगर, सिंधी कॅम्प, आंबोडी वेस, बस स्टँड रोड, उज्ज्वल नगर, नित्यानंद कॉलनी, श्रीकृष्ण नगर या भागात नगर परिषद पथक प्रतिबंधक क्षेत्र फलक लावण्याची कारवाई सुरू होती.