कडेकोट पोलीस बंदोबस्त!
By admin | Published: September 19, 2016 02:51 AM2016-09-19T02:51:43+5:302016-09-19T02:51:43+5:30
मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पृष्ठभूमीवर १0५0 पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
अकोला, दि. १८: मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पृष्ठभूमीवर रविवारी मुख्यालय मैदानावर पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून, मोर्चासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मोर्चा मार्गादरम्यान १0५0 पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ आणि अँट्रॉसिटी कायद्यात बदल, मराठा आरक्षणासाठीच्या विषयांना घेऊन अकोल्यात सकल मराठा समाजातर्फे मराठा क्रांती मूक मोर्चा सोमवारी सकाळी ११ वाजता निघणार आहे. या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने जिल्हय़ासोबतच अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ जिल्हय़ातील मराठा समाज सहभागी होणार आहे.
विराट मोर्चाचे नियोजन बघता, पोलीस दलानेसुद्धा रविवारी पोलीस मुख्यालय मैदानावर पोलीस बंदोबस्ताची तालीम घेतली आणि पोलीस अधिकारी, कर्मचार्यांना तैनातीची ठिकाणे नेमून देण्यात आली.
मोर्चा बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांना शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील हे सहकार्य करतील. मोर्चासाठीच्या बंदोबस्तासाठी जिल्हय़ातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचार्यांची अतिरिक्त कुमक मागविली आहे. यासोबतच फिक्स पॉइंट ठरविण्यात आले असून, मोर्चाचे व्हिडिओ चित्रीकरणसुद्धा करण्यात येणार आहे.
पोलीस कॅमेरे करणार मोर्चाचे चित्रीकरण
मोर्चात येणार्या लाखो मराठा बांधवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि समाजविघातक कृत्य करणार्यांना अटकाव करण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या चार चमूंकडून मोर्चाचे अकोला क्रिकेट क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचे मोर्चाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.
बॉम्बशोधक पथक, श्वानपथकही राहील तैनात
लाखोंच्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी सुरक्षेच्या कारणावरून अकोला क्रिकेट क्लब मैदानावर मेटल डिटेक्टरच्या कमानी उभारण्यात येणार आहेत. डिटेक्टर मशीनने तपासणीसुद्धा करण्यात येणार आहे. तसेच बॉम्बशोधक पथक आणि श्वानपथकसुद्धा मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी फिरून तपासणी करणार आहे.
१,0५0 पोलीस तैनात
एएसपी 0१
डीवायएसपी 0४
पोलीस निरीक्षक १४
एपीआय, पीएसआय ६५
पोलीस कर्मचारी ८२५
महिला कर्मचारी १४२
एकूण १0५0