कठोर निर्बंध, कडक अंमलबजावणी, पहिल्या दिवशी शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:18 AM2021-05-11T04:18:53+5:302021-05-11T04:18:53+5:30

अकाेला : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यात सहा दिवसांसाठी कठोर निर्बंध लागू केले ...

Strict restrictions, strict enforcement, squabbling on the first day | कठोर निर्बंध, कडक अंमलबजावणी, पहिल्या दिवशी शुकशुकाट

कठोर निर्बंध, कडक अंमलबजावणी, पहिल्या दिवशी शुकशुकाट

Next

अकाेला : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यात सहा दिवसांसाठी कठोर निर्बंध लागू केले आहेत. याच कठोर निर्बंधांचा साेमवारी पहिला दिवस हाेता. निर्बंधांची कडक अंमलबजावणी झाल्यामुळे नेहमी नागरिकांची वर्दळ राहणारे चौक आणि रस्ते निर्मनुष्य होते. शिवाय, अकाेला शहरातील अनेक रस्ते आणि चौकात स्मशानशांतता होती. एकूणच पहिल्या दिवशी अकाेलेकरांनी कठोर निर्बंधांचे पालन केले.

जिल्ह्यात कोविडबाधितांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येने आराेग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला वेळीच ब्रेक न लावल्यास जिल्ह्यात कोविड विषाणू मृत्यूचे सत्र वाढण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. कठोर निर्बंधांशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक राहिला नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी रविवार रात्रीपासून सक्तीची संचारबंदी लागू करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्यात. याच सूचनांची साेमवारी सकाळी ७ वाजेपासून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. सक्तीच्या संचारबंदीच्या काळात प्रत्येक नागरिकाने घरात थांबून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने नेहमी वर्दळ राहणारे चौक आणि रस्ते आज निर्मनुष्य होते. तर ज्यांनी कठोर निर्बंध लागू होऊन बेशिस्तीचा परिचय दिला त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

एसटीची चाके थांबली

कठोर निर्बंधांच्या काळात खासगी ट्रॅव्हल्स सेवा, राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद होती. त्यामुुळे जिल्ह्यातील रापमची बसस्थानके निर्मनुष्य होती, तर रापमच्या बस जिल्ह्यातील पाचही आगारात मुक्कामी होत्या.

व्यावसायिकांनी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने ठेवली कुलूपबंद

वैद्यकीय सेवेची प्रतिष्ठाने वगळता इतर सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने कुलूपबंद हाेती. व्यावसायिकांनीही स्वयंस्फूर्तीने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

पेट्रोल पंपही होते बंद

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये कठोर निर्बंध लागू करण्यात आल्याने नागरी भागातील पेट्रोल पंप साेमवारी सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद हाेते. केवळ शासकीय वाहने, रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्या वाहनांकरिता शहानिशा केल्यावरच पेट्रोल व डिझेल उपलब्ध करून दिले जात होते.

कडक उन्हात पोलिसांनी दिला खडा पहारा

अकाेल्याचे तापमान राज्यात उच्चांकी असूनही पोलिसांसह कोविड नियंत्रण पथकातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी तळपत्या उन्हाची पर्वा न करता प्रमुख चौकांत नाकेबंदी करून खडा पहारा दिला. यावेळी घराबाहेर पडलेल्या व्यक्तींची चौकशी करण्यात आली. शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात आवश्यक ठिकाणी पोलिसांची नाकेबंदी होती. या ठिकाणी घराबाहेर पडलेल्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी केली जात होती.

Web Title: Strict restrictions, strict enforcement, squabbling on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.