ग्रामीण भागात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:18 AM2021-05-10T04:18:03+5:302021-05-10T04:18:03+5:30
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, तातडीने नियोजन करून कोरोना संसर्गाची साखळी ...
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, तातडीने नियोजन करून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी ग्राम प्रशासनातील कर्मचाऱ्यांना दिले.
जिल्ह्यातील बाळापूर, बार्शिटाकळी व तेल्हारा तालुक्यांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, आशा स्वयंसेविका, अंगणवाडीसेविका, जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, प्राथमिक आरोग्य केंद्रांतील अधिकारी, कर्मचारी तसेच तालुकास्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बैठकीत ते बोलत होते.
ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी प्रत्येक तालुक्यातील पंचायत समिती व ग्रामपंचायतनिहाय कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी गावपातळीवर वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणासाठी गावातील नागरिक घराबाहेर पडणार नाहीत, यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी साैरभ कटियार यांनी ग्राम प्रशासनातील संंबंधित कर्मचाऱ्यांना दिले. तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी चाचण्या वाढवून, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या चाचण्या करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.