नियमांचे सक्तीने पालन करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:24 AM2021-02-17T04:24:11+5:302021-02-17T04:24:11+5:30
अकोला: जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेत, मास्कचा वापर ...
अकोला: जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेत, मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून, मास्कचा वापर आणि ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ व हात धुणे या नियमांचे सक्तीने पालन करण्याचे निर्देश पालक सचिव सौरभ विजय यांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्ह्यात कोरोना संक्रमाची व्याप्ती वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांच्या कामांचा आढावा पालक सचिव सौरभ विजय यांनी ‘व्हिडिओ काॅन्फरन्सिंग’व्दारे घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, मनपाचे वैद्यकीय अधिकारी फारुख शेख, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन चाचण्यांचे प्रमाण वाढवा. तसेच विलगीकरण करण्यात आलेले रुग्ण नियमांचे पालन करीत नसल्यास त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याच्या सूचनाही पालक सचिव सौरभ विजय यांनी दिल्या.
बाजार, गर्दीच्या ठिकणी कारवाई करा;
पोलीस प्रशासनाला निर्देश!
जिल्ह्यातील बाजार व गर्दीच्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करण्याचे निर्देश पालक सचिवांनी दिले. तसेच कोरोना उपाययोजनांबाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही पालक सचिव सौरभ विजय यांनी जिल्हा प्रशासनाला यावेळी दिल्या.