जिल्ह्यात पावसाची दमदार एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 09:44 PM2019-07-03T21:44:58+5:302019-07-03T21:45:52+5:30
मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर सलग बुधवारी दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कायम होता. त्यामुळे पाच तालुक्यातील १४ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून जिल्ह्यात सरासरी ६२.४९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे बळीराजा सुखावला असून जिल्ह्यात पेरणीच्या कामांना वेग आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर सलग बुधवारी दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कायम होता. त्यामुळे पाच तालुक्यातील १४ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून जिल्ह्यात सरासरी ६२.४९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे बळीराजा सुखावला असून जिल्ह्यात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. तर पावसाळ्यापूर्वी नगर परिषदेने शहरातील नाल्यांची सफाई न केल्याने बुधवारी शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले होते.त्यामुळे याचा शहरातील नागरिकांना फटका बसला. मात्र पावसामुळे कुठलीही जीवीत हानी झाली नाही.
मंगळवारी रात्रीपासून पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली असून बुधवारी दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. तब्बल महिनाभराच्या कालावधीनंतर पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तिरोडा तालुक्यातील सरांडी गावाजवळ निर्माणाधीन पुलाशेजारील चुकीने तयार करण्यात आलेला कच्चा रस्ता व दुभाजकामुळे ट्रक पलटल्याने तिरोडा-तुमसर मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती.
गोंदिया शहरातील गणेशनगर भागात एक घर कोसळले मात्र कुठलीही जीवीतहानी झाली नाही. मंगळवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे कुंभारेनगरातील पंचशील झेंडा चौक परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे.
विशेष म्हणजे दरवर्षीच या भागात ही समस्या निर्माण होते. नगर परिषदेने अद्यापही यावर उपाय योजना केली नाही. या भागातील नाल्या तुंबल्याने या भागातील रस्ते सुध्दा जलमय झाल्याचे चित्र होते. तर काही नागरिकांच्या घरात सुध्दा रस्त्यावरील पाणी साचले होते.
जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून पाऊस झाला नव्हता परिणामी पेरणीची कामे पूर्णपणे खोळंबली होती.त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने सर्वांना दिलास दिला आहे. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले भरुन वाहत होते. तर शेतांमध्ये पाणी साचले होते.
नगर परिषदेची पोलखोल
मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर बुधवारी दुपारपर्यंत कायम होता. त्यामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले होते. तर पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई न केल्याने नाल्या चोख होवून नाल्यांमधील घाण पाणी रस्त्यांवरुन वाहत होते. नागरिकांनी अनेकदा याबाबत स्थानिक नगरसेवकाकडे तक्र ारी केल्या त्यानंतर त्यांनी पाहणी केली. मात्र कुठल्याच उपाय योजना केली नाही. परिणामी वॉर्डातील भय्यालाल वासनिक,अजगर अली, मुन्ना डोहरे, सुनील चव्हाण यांच्या घरासमोरील असलेल्या रस्त्यांवरून पाणी तुडूंब भरून वाहत असल्यामुळे त्यांना घराबाहेर जाणे कठिण होते. ऐवढेच नव्हे तर, त्यांच्या घरात पाणी शिरत असल्यामुळे त्यांना रात्रभर जागून काढावी लागली. त्यामुळे नगर परिषदेच्या मान्सूनपूर्व कामाची पोलखोल झाली.
अतिक्रमणामुळे पाणी रस्त्यावर
कुंभारेनगरातील नाल्यांवर नागरिकांनी मोठ्या काही प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे नगर परिषदेला साफसफाई करण्यासाठी त्रास होतो. नाल्यांमध्ये कचरा साचून पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पाणी रस्त्यांवर साचून राहते. परिणामी वार्डातील रस्त्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त होते. काही ठिकाणी तर चक्क गल्ल्यांवरही नागरिकांनी अतिक्र मण केल्याने गल्ल्या लहान होऊन पाणी बाहेर जात नाही. त्यामुळे दरवर्षीच कुंभारेनगर रस्त्यांवर पाणी साचते.त्यासोबतच येथील नाल्या अरूंद असल्यामुळे पाणी सरळ वाहून जाण्यास अडचण होते.
अंडरग्राऊंड पूल पाण्याखाली
शहरातील रेलटोली परिसरातील अंडरग्राऊंड पुलाखालून जवळपास गुडघाभर पाणी वाहात होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बुधवारी सायंकाळपर्यंत ठप्प झाली होती. अंडरग्राऊंड परिसरातून एक नाला वाहत असून या नाल्याची सफाई न केल्याने यातील पाणी या परिसरातून वाहत होते त्यामुळेच ही समस्या निर्माण झाल्याचे बोलल्या जाते.
मैदानाला आले तलावाचे स्वरूप
कुंभारेनगरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह परिसरात असलेल्या मैदानात लहान मुलांना खेळण्यासाठी खेळाचे साहित्य लावण्यात आले आहेत. ते साहित्य मजबूत स्थितीत बसविण्यात न आल्यामुळे अनेक साहित्य जमिनीतून उखळून पडले आहेत. त्या ठिकाणी पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त होते.
वृक्षलागवडीचे खड्डे गेले पाण्यात
शहरात नगर परिषदेच्यावतीने वृक्षलागवड मोहिमेतंर्गत वृक्षलागवड करण्यासाठी कुंभारेनगरातील मैदान परिसरात खड्डे खोदून ठेवले. मात्र, मैदानात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले. त्यामुळे या खड्डयांमध्ये वृक्षारोपण करायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मेडिकल व बीजीडब्ल्यूला पाण्याचा वेढा
मंगळवारी रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय(मेडिकल)आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयाला (बीजीडब्ल्यू) रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.त्यामुळे या दोन्ही रुग्णालयांना पाण्याने वेढा घातल्याचे चित्र होते.सुदैवाने याचा रुग्णांना फटका बसला नाही. मात्र पावसाचा जोर कायम राहिल्यास बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या वॉर्डात पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या महसूल मंडळात अतिवृष्टी
मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील २२ पैकी १४ महसूल मंडळात पावसाची अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात दासगाव, खमारी, कामठा, नवेगावबांध, बोंडगाव, अर्जुनी मोरगाव, महागाव,केशोरी,वडेगाव, कट्टीपार, आमगाव, ठाणा, सौंदड, सडक अर्जुनी महसूल मंडळाचा समावेश आहे. तर गोंदिया ६२ मि.मी., मुंडीपार ६० मि.मी, ठाणेगाव ६३ मि.मी, तिगाव ६१.६० मि.मी., या महसूल मंडळात ६० मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.
तलावाला पडल्या भेगा
तालुक्यात दोन दिवस झालेल्या पावसामुळे गोरेगाव तालुक्यातील तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पावसामुळे कृषी विभागाच्या भोंगळ कारभाराची सुध्दा पोलखोल झाली. पहिल्याच पावसाने शेततळे फुटल्याने या बांधकामावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. या सर्व कामाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.