उत्तम रोगप्रतिकारकशक्ती ‘कोरोना’विरूद्धचं प्रभावी शस्त्र - डॉ. श्यामकुमार शिरसाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 05:47 PM2020-06-13T17:47:24+5:302020-06-13T17:47:36+5:30
स्वत:सह इतरांचाही कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन डॉ. श्यामकुमार शिसराम यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
अकोला : वातावरणातील बदलांमुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकला यांसारखे साथीचे आजार उद््भवू शकतात. शिवाय, शहरात गर्दीही वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वत:सह इतरांचाही कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन डॉ. श्यामकुमार शिसराम यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
बदलत्या वातावरणामुळे ‘कोरोना’चा फैलाव होऊ शकतो का?
- ऋतुबदलाच्या काळात साथीचे आजार डोके वर काढू लागतात. त्यामुळे कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, त्यापासून बचावासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. फिजिकल डिस्टन्सिंगसह मास्कचा वापर करणे, नियमीत हात धुणे आदि सवयी लावणे आवश्यक आहे.
कोरोनाविरूद्धच्या लढ्यात प्रभावी शस्त्र कोणते?
- कोरोनाचा विषाणू आपल्यापर्यंत येऊच नये, यासाठी प्रामुख्याने प्रतिबंधात्मक उपाय प्रभावी ठरू शकतात. परंतु, त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे नागरिकांनी रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. प्रशासनही उपचारादरम्यान रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातो.
रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी काय करावे?
- रोजच्या जेवणात प्रथिनेयुक्त सकस आहाराचे सेवन करावे. यामध्ये प्रामुख्याने दाळी, पालेभाज्या, दुध, गुड-शेंगदाणे आदिंचे सेवन करावे. परंतु, पालेभाज्या घेतल्यानंतर ते योग्य पद्धतीने स्वच्छ करुनच त्याचे सेवन करावे. शिवाय, नियमीत व्यायाम करावा. संतुलीत आहार व निरोगी शरीर असेल, तर कोरोनाचा धोकाही कमी असेल.
कोरोनाच्या रुग्णांसाठी आरोग्य यंत्रणेकडून काय तयारी?
- रुग्णालयाकडे उपलब्ध साधन आणि मनुष्यबळानुसार कोविड रुग्णांना आवश्यक सर्वच सुविधा पुरविण्यात येत आाहेत. रुग्णांना दिल्या जाणाºया जेवणाचा दर्जाही ‘एफडीए’कडून तपासून घेण्यात आला आहे. शिवाय, हे जेवण रुग्णांना देण्यापूर्वी आम्ही स्वत: ते सेवन करतो. शिवाय, रुग्णांच्या नातेवाइकांकडूनही जेवणाच्या दर्जाची पुष्टी केली जात आहे. प्रशासन सर्वोतोपरी रुग्णसेवेस प्राधान्य देत असून, नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य केल्यास परिस्थिती आणखी सुधारू शकेल.
वातावरणातील बदलांपासून आरोग्याचा बचाव कसा करायचा?
- वातावरणातील बदलांमुळे सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच असतात. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही; पण सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज आहे. त्यासाठी नागरिकांनी घराबाहेर निघू नये, मास्कचा वापर करावा, वारंवार हात साबनाने धुवावे.
संचारबंदीमध्ये मिळालेली सुट आणि बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारांचा धोका पाहता कोरोनाचा आणखी फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत कोरोना विरूद्ध लढायचं असेल, तर उत्तम रोगप्रतिकारकशक्ती प्रभावी शस्त्र ठरू शकते. त्यासाठी सकस आहाराचे सेवन करण्यासोबत विषाणूला स्वत:पासून दूर ठेवण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपायही तेवढच प्रभावी ठरणार आहेत. - डॉ. श्यामकुमार शिरसाम,वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला.