किडनी आजाराने त्रस्त मनोजचा संघर्ष
By admin | Published: March 26, 2017 07:27 PM2017-03-26T19:27:58+5:302017-03-26T19:27:58+5:30
मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणार्या शिवणी खदान येथील मनोज वानखडे याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने जगण्यासाठी त्याचा संघर्ष सुरू आहे.
आईने देऊ केली किडनी; प्रत्यारोपणासाठी मदतीची गरज
शिवणी खदान (अकोला) : मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणार्या शिवणी खदान येथील मनोज वानखडे याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने जगण्यासाठी त्याचा संघर्ष सुरू आहे. त्याच्या आईने किडनी देऊ केल्यानंतर प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी त्यांच्याकडे पैसाच नाही. त्यामुळे, समाजातील दानशूर लोकांनी मदत केल्यास मनोजचे प्राण वाचू शकणार आहेत.
शिवणी खदान येथील मोहन वानखडे हे दोन मुले व पत्नी बरोबर राहतात. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा गाडा हाकतात. त्यांचा मोठा मुलगा मनोज हा मोलमजुरी करून कुटुंबाच्या मिळकतीत हातभार लावतो, तर लहान मुलगा शिक्षण घेत आहे. अशातच मनोजला पोटात दुखत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे निदान केले असता त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे समजले. मनोजवर मुंबईतील केएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आधीच अठराविश्वे दारिद्रय़ असल्याने मोहन वानखडे यांनी आपल्याकडे असलेला पैसा मुलाच्या उपचारावर लावला आहे. मात्र, खर्च जास्त असल्याने ते पुढील उपचार करण्यास असर्मथ असल्याचे दिसत आहेत. नातेवाईक व गावातील लोकांकडून वर्गणी गोळा करून त्यांनी आतापर्यंत उपचार केले आहेत. किडनी देण्यासाठी दाता समोर येत नसल्याने तसेच विकत घेण्याएवढे पैसे नसल्याने मनोजची आई शालुबाई यांनी मुलाला किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. शालुबाई यांच्या सर्व तपासण्याही करण्यात आल्या आहेत. मात्र, किडनी प्रत्यार्पणासाठी जवळपास चार ते पाच लाख रुपये खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मनोजवर मुंबई येथे उपचार सुरू असून, दररोज डायलिसीस करावे लागत आहे. मनोजच्या उपचारासाठी लहान भावाने शिक्षण सोडले आहे. मनोजची पत्नी व अकरा महिन्यांची मुलगी मुंबईतच असून, त्याची सेवा करीत आहे. समाजातील दानशूर लोकांनी मदत केल्यास मनोज वानखडे यांचा संघर्ष संपणार आहे. त्यासाठी गरज आहे ती दानशूर व्यक्तींच्या पुढाकाराची. (वार्ताहर)