किरकोळ वादातून मारहाण; आरोपीस तीन वर्षांचा सश्रम कारावास
By admin | Published: July 4, 2017 02:41 AM2017-07-04T02:41:55+5:302017-07-04T02:41:55+5:30
अकोला: रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीची थट्टामस्करी केल्याने झालेल्या वादातून आरोपीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी चौथे सहदिवाणी न्यायाधीश यशदीप मेश्राम यांच्या न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीची थट्टामस्करी केल्याने झालेल्या वादातून आरोपीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी चौथे सहदिवाणी न्यायाधीश यशदीप मेश्राम यांच्या न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. साक्ष व पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी रामेश्वर ऊर्फ रामा लक्ष्मण मोरखडे (रा. अकोट फैल) याला तीन वर्ष सश्रम कारावास आणि ४0 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
लक्ष्मी क्षीरसागर हिच्या तक्रारीनुसार तिचा पती संजय क्षीरसागर हा ९ सप्टेंबर २00७ रोजी रात्री १0 वाजताच्या सुमारास किराणा दुकानावर जात असताना, आरोपी रामा मोरखडे याने त्याच्यासोबत थट्टामस्करी केली. संजयने त्याला जाब विचारला असता, आरोपी रामा मोरखडे याने संजयला पकडून जवळील हातपंपावर आपटले आणि लोखंडी पाइपने त्याच्या हातापायांवर मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी अकोट फैल पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३२६, ५0४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. पोलिसांनी घटनेचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने सात साक्षीदार तपासले. साक्ष व पुरावे ग्राह्य मानून रामा मोरखडे याला तीन वर्ष सश्रम कारावास आणि ४0 हजार रुपये दंड, न भरल्यास एक वर्षाचा कारावासाची शिक्षा सुनावली. दंडातील रकमेपैकी ३0 हजार रुपये संजय क्षीरसागर यास देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तक्रारकर्त्याची बाजू सहायक सरकारी विधिज्ञ विजय पंचोली, करुणा महाजन यांनी मांडली.
आरोपीस १३ दिवसांच्या कारावासाची शिक्षा
किरकोळ वादातून मारहाण करणारा आरोपी शेख हारुण शेख कदीर (४0 रा. पूरपीडित कॉलनी) याला चौथे सहदिवाणी न्यायाधीश यशदीप मेश्राम यांनी १३ दिवसांचा कारावास आणि एक हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावली.
अकोट फैलातील इंदिरा नगरात राहणारे इलियास खान निरबाज खान यांच्या तक्रारीनुसार किरकोळ कारणावरून आरोपी शेख हारुण शेख कदीर याने वाद घातला आणि त्याला मारहाण करून जखमी केले. इलियास खान यांच्या तक्रारीनुसार अकोट फैल पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात आरोपीविरुद्ध सबळ पुरावे मिळून आल्याने न्यायालयाने त्यास १३ दिवसांचा कारावास आणि एक हजार रुपये दंड, न भरल्यास १0 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. सहायक सरकारी विधिज्ञ अॅड. विजय पंचोली यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरवी हेकाँ रमेश राठोड यांनी केली.