एसटीच्या ‘शिवशाही’ व खासगी ट्रॅव्हल्सही रिकाम्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 10:55 AM2021-06-14T10:55:28+5:302021-06-14T10:55:35+5:30
ST's 'Shivshahi' and private travels also empty : दररोज ९५०० कि.मी. बस धावत असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले, तर खासगी बसला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.
अकोला : जिल्हा अनलॉक झाला असला तरी निर्बंधांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात सूट मिळाली नाही. त्यामुळे एसटी महामंडळाकडून रातराणी व रात्री सोडण्यात येणाऱ्या फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. दैनंदिन फेऱ्यांची संख्या वाढली असून, शिवशाही बसही रस्त्यांवर उतरल्या आहेत. मात्र, या बससोबत खासगी बसलाही प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळत आहे. निर्बंधांमध्ये सूट मिळाल्याने एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूकही पूर्ववत होत आहे. १ जूनपासून अत्यावश्यक सेवेसाठी बससेवा सुरू करण्यात आली. काही शहरातील फेऱ्या शेड्यूल करण्यात आल्या आहेत. हळूहळू निर्बंध आणखी शिथिल होत असल्याने फेऱ्यांची संख्याही वाढत आहे. या बसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. सद्य:स्थितीत शहरातील आगार क्रमांक २ मधून दररोज २२ बस सुरू आहेत. नाशिक, नागपूर, पुणे, औरंगाबाद, जळगाव खांदेश फेऱ्या सुरू झाल्या आहेत. शनिवार व रविवार प्रवाशांचा प्रतिसाद कमी प्रमाणात असतो. उर्वरित दिवसाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दररोज ९५०० कि.मी. बस धावत असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले, तर खासगी बसला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.
अमरावती मार्गावर गर्दी
एसटी महामंडळाने १ जूनपासून अमरावती मार्गावर बसचे शेड्यूल केले होते. त्यामुळे या मार्गावर प्रवासी संख्याही वाढली आहे. या मार्गावर लालपरीसोबत शिवशाही बसही सोडण्यात येत आहे. या मार्गावरील फेऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून, फेऱ्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे.
अजूनही ट्रॅव्हल्स नियमित सुरू नाहीत!
कोरोनामुळे एसटी महामंडळासोबत खासगी बसच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. बहुतांश खासगी बस मालकांनी बससेवा बंद ठेवली आहे. प्रवासी नसल्याने बस चालविणे अवघड होऊन बसले आहे.
निर्बंध शिथिल झाले आहेत; परंतु एसटी बससोबत खासगी बसलाही प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. बहुतांश खासगी बस अजूनही उभ्या आहेत. प्रवाशांनी कोरोनाची धास्ती घेतली आहे.
खासगी बसचे तिकीट जास्त असते. तरी बहुतांश प्रवासी लांबच्या प्रवासाला या बसला प्राधान्य देतात. शहरातून पुणे, मुंबई, नागपूर या लांबच्या प्रवासासाठी खासगी बस ये-जा करतात.
निर्बंधांमध्ये सूट मिळताच पूर्ण क्षमतेने खासगी बससेवा सुरू करण्यात येणार असल्याचे एका बस कंपनी मालकाने सांगितले, तसेच प्रवाशांच्या प्रतिसादावर पुढील फेऱ्या अवलंबून असल्याचेही सांगितले.
आगारातून एसटीच्या किती फेऱ्या सुरू आहेत?
२२
शिवशाही किती?
५