शिक्षकांच्या वरिष्ठ निवडश्रेणी प्रस्तावांची अडकली तपासणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:24 AM2021-09-07T04:24:14+5:302021-09-07T04:24:14+5:30
अकोला : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी लागू करण्यासाठी पंचायत समित्यांकडून जिल्हा परिषद ...
अकोला : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी लागू करण्यासाठी पंचायत समित्यांकडून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांची तपासणी अडकली आहे. तपासणीविना प्रस्ताव प्रलंबित असल्याने, जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणीचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत कार्यरत शिक्षकांपैकी सेवेची २४ वर्षे पूर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ निवडश्रेणी लागू केली जाते. परंतु गेल्या १३ वर्षांपासून जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी लागू करण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी लागू करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्हयातील सातही पंचायत समित्यांतर्गत प्राथमिक शिक्षकांचे प्रस्ताव गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आले होते. त्यानुसार पंचायत समित्यांकडून वरिष्ठ निवड श्रेणीसाठी पात्र शिक्षकांचे प्रस्ताव महिनाभरापूर्वी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाले. परंतु या प्रस्तावांची तपासणी अद्यापही प्राथमिक शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या प्रस्तावांची तपासणी केव्हा सुरू होणार आणि जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणीचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्हयातील पात्र शिक्षकांना वरिष्ठ निवडश्रेणी लागू करण्यासाठी जिल्ह्यातील पंचायत समित्यांकडून प्रस्ताव प्राप्त झाले. प्राप्त प्रस्तावांची तपासणी लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
दिलीप तायडे
उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद