अकोल्यातील तरुणाचा चेन्नईनजीकच्या समुद्रात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:24 PM2020-02-17T12:24:33+5:302020-02-17T12:24:51+5:30
मृतक विद्यार्थी अकोल्याच्या संत नगरातील असून, त्याचे नाव प्रवीण ऊर्फ दादू प्रभाकर जोशी (१८) असे आहे.
अकोला : तामिळनाडू राज्यातील कांजीवरम येथील ‘आयआयटी’त प्रथम वर्षासाठी शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा कोल्लमच्या समुद्रात बुडून मृत्यू झाला. यातील एक मृतक विद्यार्थी अकोल्याच्या संत नगरातील असून, त्याचे नाव प्रवीण ऊर्फ दादू प्रभाकर जोशी (१८) असे आहे. तर दुसरा विद्यार्थी सोलापूर येथील वैभव कुळकर्णी आहे. प्रवीणचा मृतदेह सोमवारी अकोल्यात पोहोचणार आहे.
प्रवीण, वैभव आणि इतर चौघे असे एकूण ६ जण कांजीवरमच्या आयआयटी प्रथम वर्षात शिक्षण घेत असून, हे सर्व मित्र शनिवारी कोल्लम बिचवर गेले होते. यातील प्रवीण आणि वैभव मोबाइलमध्ये सेल्फी फोटो घेण्याच्या नादात लागले. दरम्यान, समुद्रातील मोठ्या लाटेत दोघेही वाहून केले. लाटेत वाहून गेलेल्या दोन्ही युवकांचा शोध घेण्यासाठी मच्छिमारांनी परिश्रम घेतले. अखेर दोघांचे मृतदेहच हाती लागले. दोन्ही तरुण विद्यार्थ्यांच्या मृत्यूची ही बातमी अकोला आणि सोलापूर येथे पोहोचल्याने शोककळा पसरली. प्रवीण जोशी अकोला-मलकापूरच्या टीटीएन कॉलेजजवळील संत नगरातील रहिवासी आहे.
प्रवीणचा मृतदेह विमान मार्गे नागपूर येथे आणि त्यानंतर अकोल्यात सोमवारी सकाळी पोहोचणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता कौलखेड स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार होणार आहे.