नीट परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या, पुलावरून नदीत मारली उडी
By नितिन गव्हाळे | Published: September 8, 2022 06:28 PM2022-09-08T18:28:10+5:302022-09-08T18:32:41+5:30
नीट परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत म्हणून विद्यार्थिनीने आत्महत्या केली.
अकोला : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. नीट परीक्षा रिपीट करूनही अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत. त्यामुळे आता वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही. या भितीने डाबरी रोडवर राहणाऱ्या रोहिणी विलास देशमुख (२२) हिने कोतवालीजवळील पुलावरून गुरूवारी पहाटेच्या सुमारास मोर्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डाबकी रोडवरील उदय नगरात राहणारी रोहिणी विलास देशमुख हिने दुसऱ्यांदा नीट परीक्षा दिली होती.
या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून तिला ४२० गुण मिळाले होते. चांगले गुण न मिळाल्याने रोहिणी खिन्न झाली होती. मिळालेल्या गुणांच्या आधारावर मेडिकलला प्रवेश मिळणार नसल्यामुळे तिने टोकाचा पाऊल उचलून गुरूवारी पहाटेच्या सुमारास कोतवाली पोलीस ठाण्याजवळील पुलावरून मोर्णा नदीत उडी घेत आत्महत्या केली. गुरूवारी सकाळी तिचा मृतदेह पाण्यावर तरगंताना दिसून आला. पोलिसांनी तिचा मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रूग्णालयात पाठविला. रोहिणीच्या निर्णयामुळे तिच्या कुटुंबांला धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गुरूवारी पहाटेच्या सुमारास युवतीने आत्महत्या केली. तिला नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने, तिने आत्महत्या केली. असा संशय आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत. अशी माहिती सेवानंद वानखडे यांनी दिली.