आर्थिक परिस्थितीवर मात करीत रितेशने गाठले यशोशिखर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 03:23 PM2018-06-09T15:23:12+5:302018-06-09T15:39:34+5:30
अकोला: कौलखेडमधील जेतवन नगरातील (धोबी खदान)राहणारा रितेश गोविंद मोहोड याने माध्यमिक शालान्त परीक्षेत ८८.४० टक्के गुण मिळविले. १०० टक्केच्या गुणवत्ता यादीत ८८ टक्के गुण म्हणजे फारच कमी झालेत; परंतु रितेशने हे गुण आर्थिक परिस्थितीवर मात करीत मिळविले आहे. निश्चितच हे गुण १०० टक्केच्या बरोबरीचेच आहेत.
- नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: कौलखेडमधील जेतवन नगरातील (धोबी खदान)राहणारा रितेश गोविंद मोहोड याने माध्यमिक शालान्त परीक्षेत ८८.४० टक्के गुण मिळविले. १०० टक्केच्या गुणवत्ता यादीत ८८ टक्के गुण म्हणजे फारच कमी झालेत; परंतु रितेशने हे गुण आर्थिक परिस्थितीवर मात करीत मिळविले आहे. निश्चितच हे गुण १०० टक्केच्या बरोबरीचेच आहेत.
रितेश हा गायत्री नगरातील इंग्लिश हायस्कूलचा विद्यार्थी. रितेशची आई वंदना मोहोड दुसऱ्यांच्या घरची धुणी-भांडी करते. वडील गोविंद मोहोड शहरातील होलसेल मेडिकल प्रतिष्ठानात सेल्समन आहेत. मोठी बहीण रेशमा सध्या एएनएम नर्सिंग प्रशिक्षणाच्या दुसऱ्या वर्षाला आहे. आई-वडील क ामावर आणि बहीण कॉलेजमध्ये जात असल्याने स्वत:च्या घरची कामे शाळा व अभ्यास सांभाळून रितेशलाच करावी लागत होती. दहावीला असतानासुद्धा रितेशने घरातील कामे केली.
रितेशची लहानपणापासूनच हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणना व्हायची. खासगी शिकवणी वर्ग चालविणाऱ्या स्वाती राठोड-सिरसाट यांच्या संपर्कात रितेश आल्यानंतर रितेशचे जीवनच बदलून गेले. तिसऱ्या वर्गापासून रितेश स्वातीतार्इंकडे अभ्यासाला जातो. रितेशची परिस्थिती पाहून स्वातीतार्इंनी त्याच्याकडून कोणताही मोबदला कधीच घेतला नाही. स्वातीताईं मला लहान भाऊ मानतात. त्यांच्यामुळेच आज हे यश मिळाले असल्याचे रितेशने प्रांजळपणे सांगितले. रितेशला अभ्यासाव्यतिरिक्त नृत्य करायची आवड आहे. अनेक नृत्य स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक पटकाविला. नृत्यातील असा एकही प्रकार नसेल, जो रितेश करीत नाही. सर्व प्रकारचे नृत्य रितेश सहज करतो; मात्र रितेशला भविष्यात अॅस्ट्रोफिजिस्ट व्हायचे आहे. रितेशचा फिजिक्स हा विषय आवडीचा आहे. कोणीही आपल्या आर्थिक परिस्थितीची लाज बाळगू नये, जीवनात संकट येत असतात; मात्र आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत राहायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करू न आपले छंद जोपासत यशोशिखराकडे वाटचाल करावी, असे रितेशने लोकमतसोबत संवाद साधताना सांगितले.