नववीची विद्यार्थीनी बनली एक दिवसाची आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 05:56 PM2020-03-06T17:56:01+5:302020-03-06T17:58:35+5:30
एक दिवसाची प्रकल्प अधिकारी झालेल्या अंकिता हिने संपूर्ण दिवसभर उत्तमरित्या पदभार सांभाळला.
अकोला : जागतिक महिला दिनानिमित्त अकोला जिल्ह्यात सर्वत्र महिला सप्ताह राबविण्यात येत आहे. या अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला येथील प्रकल्प अधिकारी या पदाचा सांकेतिक पदभार कोथळी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थीनी अंकिता सुभाष शेळके हिच्याकडे सोपविण्यात आला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार बी. हिवाळे यांनी अंकिता हिच्याकडे एका दिवसासाठी प्रकल्प अधिकारी पदाची सूत्रे सोपवून या विद्यार्थीनीला पदाविषयीची तसेच प्रकल्प कार्यालयाच्या कामकाजाची माहिती दिली. दरम्यान, अंकिता हिने संपूर्ण दिवसभर प्रकल्प अधिकारी पदाचा कार्यभार स्विकारून प्रशासन व कार्यालयीन कामकाज कसे चालते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. तसेच प्रकल्पाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या निवासी शासकीय व अनुदानित आश्रम शाळांचे व वसतीगृहांचे नियंत्रण व कामकाज कसे चालते याचा आढावा घेतला. आदीवासी समाजासाठी राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची सभा घेऊन माहित करून घेतली. एक दिवसाची प्रकल्प अधिकारी झालेल्या अंकिता हिने संपूर्ण दिवसभर उत्तमरित्या पदभार सांभाळला. प्रकल्पाअंतर्गत आश्रम शाळा व वसतीगृहातही हा उपक्रम राबविण्यात आला. प्रकल्प कार्यालयाने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.