‘नवोदय’मध्ये गठित होणार ‘विद्यार्थी संसद’
By admin | Published: August 13, 2015 10:39 PM2015-08-13T22:39:26+5:302015-08-13T22:39:26+5:30
जिल्हाधिका-यांची संकल्पना; विद्यार्थ्यांना राजकीय लोकशाहीचे धडे.
संतोष येलकर/अकोला : विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच लोकशाहीचे धडे देण्यासाठी अकोला शहराजवळील नवोदय विद्यालयात विद्यार्थी संसद (शालेय मंत्रिमंडळ) गठित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकार्यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणार्या या उपक्रमात विद्यार्थी संसद गठित करण्यासाठी लवकरच निवडणूक कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. नवोदय विद्यालयात विद्यार्थी संसद गठित करण्याचा हा उपक्रम राज्यात पहिल्यांदाच अकोल्यात राबविण्यात येत आहे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीचे बीज रूजावे, राजकीय इच्छाशक्ती निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमधून चांगले राजकारणी घडावेत, यासाठी संसद आणि राज्य मंत्रिमंडळाच्या कामकाजाच्या धर्तीवर अकोला शहरानजीक बाभूळगाव येथील नवोदय विद्यालयात विद्यार्थी संसद स्थापन करण्यात येणार आहे. विद्यार्थी संसद (शालेय मंत्रिमंडळ) स्थापन करून, त्याद्वारे विद्यार्थ्यांंच्या अडचणी, विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासह शाळेत विविध उपक्रम राबविणे आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांंमधील कला-गुणांना विकसित करण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणार्या या उपक्रमात नवोदय विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ गठित करण्यासाठी लवकरच उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात येणार असून, ४५0 विद्यार्थी संख्या असलेल्या नवोदय विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ गठित करण्यासाठी मतदान घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये राजकीय इच्छाशक्ती निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमधून चांगले राजकीय नेते घडावेत, राजकारण आणि लोकशाहीची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, यासंबंधीची जाणीव-जागृती विद्यार्थ्यांमध्ये व्हावी, यासाठी नवोदय विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ आणि त्यासाठी निवडणूक घेण्याची संकल्पना राबविण्यात येत असल्याचे अकोल्याचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी स्पष्ट केले.
*मतदार याद्या तयार; निवडणूक कार्यक्रम १७ ऑगस्टपासून!
नवोदय विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ गठित करण्यासाठी उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्यामार्फत १७ ऑगस्ट रोजी निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच वर्गप्रमुख, मंत्री आणि मुख्यमंत्री पदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारणे व निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याचे काम या निवडणुकीत करण्यात येणार आहे.
*जिल्हाधिकारी निवडणूक
आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळणार! नवोदय विद्यालयातील शालेय मंत्रिमंडळाच्या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग होणार नाही, आचासंहितेची अंमलबजावणी काटेकोर व्हावी, निवडणूक चांगल्या वातावरणात पार पडावी, यासाठी निवडणूक आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी काम पाहणार असून, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अकोल्याचे उपविभागीय अधिकारी काम पाहणार आहेत.