विद्यार्थी, तरुणाईने सादर केला मनाला भुरळ घालणारा कलाविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 01:52 PM2019-10-04T13:52:11+5:302019-10-04T13:52:17+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विदर्भस्तरीय युवा महोत्सवाला थाटात प्रारंभ झाला .
अकोला : विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विदर्भस्तरीय युवा महोत्सवाला थाटात प्रारंभ झाला असून, विद्यार्थी, तरुणाईने मनाला भुरळ घालणाऱ्या नृत्य, गीत-गायनासह विविध कलाकुसर सादर केली. यातूनच विद्यार्थ्यांच्या जीवनात नव्या दिशेने भरारी घेण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी बुधवारी युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांना अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देत असून, अशा महोत्सवाच्या माध्यमातून राज्य तथा राष्ट्रीय पातळीवरचे कलाकार निर्माण झाल्यास विद्यापीठाचा लौकिक निश्चितपणे वाढेल, असा आशावाददेखील डॉ. भाले यांनी व्यक्त केला. डॉ. व्ही. के. खर्चे, डॉ. पी. आर. कडू, डॉ. वाय. बी. तायडे, डॉ. आर. जी. देशमुख, महोत्सवाचे प्रमुख आयोजक डॉ. एस. एस. माने यांच्यासह आयोजन समिती अध्यक्ष डॉ. एम. व्ही. तोटावार यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. तोटावार यांनी केले. संचालन डॉ. प्रज्ञा कदम यांनी केले. डॉ. राजेश्वर शेळके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आज समारोप
डॉ. पंदेकृविच्या डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात आयोजित तीन दिवसीय युवा महोत्सवाचा समारोप शुक्रवार, ४ आॅक्टोबर रोजी होणार आहे. युवा महोत्सवामध्ये १५ कृषी महाविद्यालये सहभागी झाली असून नृत्य, शास्त्रीय संगीत, रांगोळी, क्ले मॉडेलिंग, चित्रकला, वादविवाद आदी स्पर्धांत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.