बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:13 PM2019-05-29T12:13:22+5:302019-05-29T12:16:16+5:30
बारावीच्या परीक्षेत अपेक्षेनुसार गुण न मिळाल्याने विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पिंप्री खुर्द (अकोला) : बारावीच्या परीक्षेत अपेक्षेनुसार गुण न मिळाल्याने विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अकोट तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे मंगळवारी दुपारी घडली. अश्विनी गजानन सलामे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
इयत्ता १२ वीचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर करण्यात आला. या निकालात पिंप्री खुर्द येथील अश्विनी सलामे या विद्यार्थिनीला ८० ते ९० टक्के गुण मिळण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात गुणपत्रिका पाहिल्यानंतर तिला ५१.५७ टक्केच गुण मिळाले. त्यामुळे अभ्यास करूनही गुण कमी मिळाल्याने अश्विनी निराश झाली होती. नैराश्यातून तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब कुटुंंबीयांच्या लक्षात येताच तिला तातडीने ग्रामीण रुग्णालय अकोट येथे हलविले. डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. यावेळी सोबत असलेल्या नातेवाइकांनी बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तिने आत्महत्या केल्याचे सांगितले. याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.