विद्यार्थी हजेरीसाठी ‘टिंबां’चा आधार!
By Admin | Published: April 12, 2017 02:07 AM2017-04-12T02:07:27+5:302017-04-12T02:07:27+5:30
अकोला: शालेय पोषण आहारातील तांदळाचा मोठ्या प्रमाणात अपहार होण्याला विद्यार्थ्यांची हजेरी नोंदवहीत घेतली जाणारी नोंद कारणीभूत आहे.
अकोला: शालेय पोषण आहारातील तांदळाचा मोठ्या प्रमाणात अपहार होण्याला विद्यार्थ्यांची हजेरी नोंदवहीत घेतली जाणारी नोंद कारणीभूत आहे. त्या बळावरच मुख्याध्यापक आणि कंत्राटदाराच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात तांदळाचा अपहार होत असल्याचे उघड सत्य असताना त्याकडे सर्वच यंत्रणेचे कमालीचे दुर्लक्ष आहे. ही बाब शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट यांनी दिलेल्या शाळा भेटीत स्पष्ट झाली. त्याचीही चौकशी करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी दिले आहेत.
बोरगावमंजू येथील मराठी शाळा क्रमांक १,२,३ या शाळांमध्ये सोमवारी सकाळीच सभापती अरबट यांनी भेट दिली.
यावेळी शालेय पोषण आहाराची दैनंदिन नोंदवही सत्र सुरू झाल्यापासून भरण्यात आली नव्हती. सोबतच १० ते २६ मार्च २०१७ या काळात पोषण आहार देणे बंद होते.
त्याचवेळी शालेय पोषण आहारासाठी विद्यार्थी उपस्थिती १६० दाखवण्यात आली. त्यापैकी केवळ ९९ विद्यार्थीच उपस्थित होते.
त्यामुळे हजेरीमध्येही तफावत दिसून आली. १८ ते २४ मार्चदरम्यान साठा नसल्याने पोषण आहार बंद असल्याचे सांगण्यात आले. पोषण आहार सकाळी ९.३० वाजता देण्यात आला.
या संपूर्ण प्रकाराचे पत्र सभापती अरबट यांनी शिक्षण विभागाला दिले. त्यानुसार अकोला तालुका पोषण आहार अधीक्षकांना चौकशीचे आदेश देण्यात आले.
६१ विद्यार्थ्यांचा आहार कोणाच्या घशात?
विद्यार्थी उपस्थित नसताना त्यांचा पोषण आहार उचलला जातो. प्रत्यक्षात त्याची उचलच होत नाही. पुरवठा करणाऱ्याशी संगनमताने हा तांदूळ बाजारात विकला जातो. हजेरीपुस्तकात विद्यार्थ्यांच्या नावापुढे टिंब लिहिण्यात आले. त्याचा इंग्रजीत ए किंवा पी करून घोटाळा केला जातो.
बोरगावातील ६१ विद्यार्थी गैरहजर होते. त्याचवेळी १६० विद्यार्थ्यांना पोषण आहार दिल्याचे दर्शवण्यात आले. केवळ ९९ विद्यार्थ्यांना आहार देण्यात आला. त्यामुळे ६१ विद्यार्थ्यांचा आहार कोणाच्या घशात जातो, याचा शोध आता शिक्षण विभागाला घ्यावा लागणार आहे.
दरमहा २.५० क्विंटलचा अपहार
बोरगावातील या शाळेचा विचार केल्यास दरडोई ठरलेल्या प्रमाणानुसार दर दिवशी किमान दहा किलो तांदूळ शिल्लक राहतो. शाळेच्या दिवसाचा विचार केल्यास दरमहा किमान २.५० क्विंटल तांदूळ शिल्लक राहतो. तो कोण फस्त करतो, याच्या मागे मोठे अर्थकारण दडलेले आहे. अकोला तालुक्यातील शाळांची संख्या पाहता त्यामध्ये शिल्लक राहणारा दरमहा किमान ३०० क्विंटल तांदूळ काळ्या बाजारात जातो.