बाजारपेठ भेटीतून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:32 PM2019-09-18T12:32:59+5:302019-09-18T12:33:25+5:30
या प्राथमिक शाळेच्या वर्ग तिसरी व चौथीच्या एकावन्न विद्यार्थ्यांनी जुन्या भाजी बाजाराला भेट दिली.
अकोला : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना प्रायोगिक प्रात्यक्षिक ज्ञान देण्यासाठी स्थानिक खंडेलवाल मराठी प्राथमिक शाळेने बाजारपेठ भेटीतून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे धडे दिलेत.
या प्राथमिक शाळेच्या वर्ग तिसरी व चौथीच्या एकावन्न विद्यार्थ्यांनी जुन्या भाजी बाजाराला भेट दिली. या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होय. आर्थिक व्यवहार सामाजिक व्यवस्थेची जाणीव करण्याचा हा प्रयोग आहे. दैनंदिन जीवनात हिरव्या पालेभाज्या व फळभाज्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाज्या कुठून येतात, ती कशी पिकते, भाव काय, त्याचे स्वरूप काय, याची जाणीव भाजी बाजारात गेल्याशिवाय कळत नाही. भाजी विक्रेत्यांशी कसे बोलावे, माप, वजन, पाव, अर्धा किलो, किलो या मापांचे प्रात्यक्षिकाद्वारे मुलांना कळते. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या भाज्या कांदे, वांगे, बटाटे, कोथिंबीर, काकडी, मिरच्या इत्यादी प्रकारच्या भाज्या विकत घेताना भाजीचा भाव केला तसेच भाजी विक्रेत्यांना तुम्ही हा व्यवसाय किती वर्षांपासून करता, तुम्हाला यात नफा आहे का, असे विविध प्रश्न विचारले. भाजी बाजारातील भाजी विक्री त्यांना आनंद आणि विद्यार्थ्यांना ज्ञान आणि आनंद मिळाला. पुन्हा मुलांना बाजारात घेऊन या, असा आग्रह भाजी विक्रेत्यांनी शिक्षकांना केला. हा उपक्रम ग्रंथालय विभागातर्फे राबविण्यात आला. या प्रकल्पाला संचालक मंडळाचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका गीता चांदवडकर, शिक्षक दुर्गा वैद्य, ज्योती जाजू, नीलाक्षी रायपुरे, दीपक उगले, नागोराव ढोरे व गोपाल नेरकर यांचे सहकार्य लाभले.