विद्यार्थ्यांचा कृषी अभ्यासक्रमाकडे कल वाढला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 01:33 PM2020-01-24T13:33:17+5:302020-01-24T13:33:36+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता आतापासूनच ‘सीईटी’ घेण्याची तयारी केली आहे.
अकोला : गत चार-पाच वर्षात विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडे कल वाढला असून, दरवर्षी १ लाखावर विद्यार्थी प्रवेशासाठी ‘सीईटी’ सामायिक प्रवेश परीक्षा देत आहेत. यावर्षीही डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता आतापासूनच ‘सीईटी’ घेण्याची तयारी केली आहे.
(एमसीईएआर) महाराष्टÑ कृषी, शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत केंद्रीय पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. राज्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअकोला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ ही चार कृषी विद्यापीठे असून, विद्यापीठे व खासगी कृषी महाविद्यालये मिळून राज्यात १९० कृषी महाविद्यालये आहेत. बी.एससी प्रथम वर्षासाठीची प्रवेश क्षमता एकूण १४,७०० आहे. गत चार-पाच वर्षांपासून राज्यात जवळपास १ लाखावर विद्यार्थ्यांनी कृषी पदवीसाठी अर्ज केले होते. जागा १४ हजार ५०० च्या जवळपास असल्याने उर्वरित हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित होते. बारावीची परीक्षा विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार बी.एससी. कृषी अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. कृषी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याने स्पर्धा वाढली आहे. यावर्षी यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने आॅनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. विदर्भात डॉ. पंदेकृवि अंतर्गत शासकीय महाविद्यालयात सीईटी घेतली जाते. त्या अनुषंगाने कृषी विद्यापीठाच्या शिक्षण विभागाने नियोजन करण्यात सुरुवात केली आहे.
हे आहेत बी. एससीचे विषय
बी. एससी पदवीसाठी बी. एससी कृषी, उद्यानविद्या शास्त्र, मत्स्य विज्ञान, वनशास्त्र, पशुसंवर्धन, सामाजिक विज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, बीटेक कृषी अभियांत्रिकी, बीटेक अन्न तंत्रज्ञान, कृषी जैव तंत्रज्ञान आदी विषय आहेत.
अलीकडच्या काही वर्षात विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडे कल वाढल्याने प्रवेश वाढले आहेत. या अनुषंगाने एमसीईएआर केंद्रीय पद्धतीने सीईटी परीक्षा घेते. तथापि, ही परीक्षा कृषी विद्यापीठाच्या केंद्रावर घेतली जात असल्याने त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.
- डॉ. प्रदीप जी. इंगोले,
संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषी),
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.