चित्रकला परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी गोंधळात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 04:04 PM2019-09-25T16:04:43+5:302019-09-25T16:04:49+5:30
तांत्रिक अडचणींमुळे कला संचालनालयाने ही परीक्षा पुढे ढकलली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शासकीय ग्रेड चित्रकला परीक्षा(एलिमेंटरी व इंटरमिजिएट) परीक्षा २६ ते २९ सप्टेंबरदरम्यान अमरावती विभागातील सर्व परीक्षा केंद्रांवर होणार होती; परंतु तांत्रिक अडचणींमुळे कला संचालनालयाने ही परीक्षा पुढे ढकलली आहे. त्यामुळे विभागात वितरीत केलेल्या मोहोरबंद प्रश्नपत्रिका केंद्र प्रमुखांकडून परत मागविल्याने विद्यार्थी गोंधळात पडले असून, त्यांच्या अनेक महिन्यांच्या मेहनतीवर पाणी फेरल्या गेले आहे.
राज्यात एकाचवेळी एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्यात येतात. परीक्षा घेण्याचे नियोजन व वेळापत्रकसुद्धा कला संचालनालयाने जाहीर केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कसुद्धा संबंधित केंद्र प्रमुखांनी कला संचालनालयाकडे जमा केले.
यंदा एलिमेंटरी परीक्षा २६ व २७ सप्टेंबर रोजी व व इंटरमिजिएट परीक्षा २८ व २९ सप्टेंबर रोजी होणार होती. राज्यात परीक्षेला लाखो विद्यार्थी बसले होते. परीक्षेची विद्यार्थ्यांनी चांगली तयारीसुद्धा केली होती.
एवढेच नाही तर अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम आणि अमरावती येथील केंद्र प्रमुखांनी अमरावती येथे जाऊन मोहोरबंद प्रश्नपत्रिकासुद्धा ताब्यात घेतल्या होत्या; परंतु दोन दिवसांवर आलेली परीक्षा कला संचालनालयाने तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलल्याने आता केंद्र प्रमुखांना पुन्हा अमरावती येथे जाऊन मोहोरबंद प्रश्नपत्रिका जमा कराव्या लागणार आहेत.
एकंदरीतच एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेसाठी केंद्रावर करण्यात आलेल्या तयारीवर पाणी फेरल्या गेले आहे. परीक्षेसंबंधीचे पुढील वेळापत्रक स्वतंत्रपणे कला संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे परीक्षा नियंत्रक नागेश वाघमोडे यांनी स्पष्ट केले आहे.
प्रश्नपत्रिकांची कमतरता
एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका कमी छापल्या गेल्या. अमरावती येथे मोहोरबंद प्रश्नपत्रिका आणण्यासाठी केंद्र प्रमुख गेले होते. या केंद्र प्रमुखांना एखाद्या केंद्रांवर ३00 विद्यार्थी परीक्षा देणार असतील तर त्या केंद्रासाठी केवळ १00 प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. याबाबत केंद्र प्रमुखांनी विचारणा केली असता, प्रश्नपत्रिका कमी असल्यामुळे मोहोरबंद प्रश्नपत्रिकांची पाकिटे फोडून त्याच्या झेरॉक्स काढण्याचा अजब सल्ला देण्यात आला. या प्रकारामुळे परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका फुटण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
केंद्र प्रमुखांना आर्थिक भुर्दंड!
परीक्षेसाठी केंद्र प्रमुखांना कोणताही खर्च मिळत नाही. स्वखर्चाने केंद्र प्रमुखांनी अमरावतीला जाऊन प्रश्नपत्रिका आणल्या होत्या. आता परीक्षा पुढे ढकलल्याने, पुन्हा प्रश्नपत्रिका पोहोचून द्याव्या लागणार आहेत. यामुळे केंद्र प्रमुखांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेची संपूर्ण तयारी झाली असताना, कला संचालनालयाने परीक्षा पुढे ढकलली. मोहोरबंद प्रश्नपत्रिकासुद्धा वितरित केल्या होत्या; परंतु प्रश्नपत्रिका कमी देऊन झेरॉक्स काढण्याचा अजब सल्ला देण्यात आला. आता परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुन्हा प्रश्नपत्रिका वितरण केंद्रावर जमा कराव्या लागणार आहेत. हा आर्थिक भुर्दंड कोण देणार?
-संजय आगाशे,
जिल्हाध्यक्ष
अकोला जिल्हा कलाध्यापक संघ