अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2016 02:31 AM2016-06-17T02:31:18+5:302016-06-17T02:31:18+5:30
कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; २५ जूनपर्यंत भरता येणार अर्ज.
अकोला: जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालये, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयांची अकरावी कला, विज्ञान आणि वाणिज्य, संयुक्त शाखांमधील प्रवेश प्रक्रिया गुरुवार, १६ जून रोजी सुरू झाली. पहिल्याच दिवशी विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी मोठी गर्दी उसळली होती. माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आता अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी नियोजित वेळापत्रक आणि गुणवत्तेनुसारच प्रवेश देण्याचा आदेश माध्यमिक शिक्षण विभागाने दिला आहे. जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील सर्व शाखांचे प्रवेश निश्चित करताना एकसूत्रता यावी आणि सर्व प्रवेश गुणवत्तेनुसार देण्यात यावे, यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने महाविद्यालयांना प्रवेशाचे वेळापत्रक दिले आहे. या वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. गुरुवार, १६ ते शनिवार, २५ जूनपर्यंंत प्रवेश अर्जांचे वाटप तसेच विद्यार्थ्यांंनी भरलेले प्रवेशपत्र स्वीकारण्यात येणार आहेत. केवळ दहा दिवसांचा कालावधी असल्याने विद्यार्थ्यांंनी पहिल्या दिवशी मोठी गर्दी केली होती. २८ जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर २९ ते ३0 जून या दोन दिवसांत पहिल्या यादीनुसार प्रवेश दिला जाणार आहे. १ जुलै रोजी पहिली प्रतीक्षा यादी जाहीर होणार असून, १ ते ४ जुलै दरम्यान पहिल्या प्रतीक्षा यादीनुसार प्रवेश दिला जाणार आहे. ५ जुलै रोजी दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर होणार असून, ७ व ८ जुलै दरम्यान दुसर्या प्रतीक्षा यादीनुसार प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल.